पुणे : उंड्री, पिसोळी, मोहम्मदवाडी, येवलेवाडी आणि कोंढवा परिसरात वाढत्या रस्ते अपघातांबाबत नागरिकांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या वतीने पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे निवेदन देऊन रस्ता सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मोहम्मदवाडी परिसरातील रस्त्यांवर मोठ्या वाहनांची वाढलेली वर्दळ, अपुरी प्रकाशव्यवस्था, वाहतूक नियोजनाचा अभाव तसेच काही ठिकाणी अपूर्ण आणि धोकादायक रस्त्यांच्या कामांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर जड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण, रस्त्यांवरील प्रकाशव्यवस्था सुधारणे, वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे, धोकादायक व अपूर्ण रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करणे तसेच अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडून केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष कृती अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. रस्ता सुरक्षेबाबत मिळणाऱ्या प्रत्येक इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वेळेत उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
“आणखी एका कुटुंबाला आपल्या प्रिय व्यक्तीला गमवावे लागू नये, यासाठी प्रशासनाने दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी त्यापूर्वीच प्रतिबंधात्मक पावले उचलावीत,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
मोहम्मदवाडी, उंड्री, पिसोळी, येवलेवाडी आणि कोंढवा परिसरातील रस्ता सुरक्षेचा प्रश्न आता गांभीर्याने घेऊन संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.“बस झाले, आता जीव वाचविण्यासाठी ठोस कृती करा,” असा संतप्त सूर नागरिकांमध्ये उमटत असून, प्रशासनाने तातडीने रस्ता सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
“बस झाले, आता जीव वाचविण्यासाठी ठोस कृती करा,” असा संतप्त सूर नागरिकांमध्ये उमटत असून, प्रशासनाने तातडीने रस्ता सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
















