पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्यांतर्गत महाळुंगे येथील अंगणवाडी क्रमांक २६३, २६४ आणि २६५ येथे ‘आंगन का मिलन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांचा सन्मान करून त्यांच्या सेवाभावी कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी अंगणवाडीतील बालकांचे पालक, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांशी संवाद साधला. त्यांच्या अनुभवांची आणि विचारांची देवाणघेवाण करत बालकांचे शिक्षण, संस्कार, आरोग्य आणि संगोपन यामध्ये अंगणवाडी सेविकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर भर देण्यात आला.
अंगणवाडी सेविका या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच माता आणि बालकांच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी सातत्याने कार्यरत असतात. त्यांच्या समर्पित कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी प्रभाग समितीच्या अध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी चिमटे, भाजप उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, ज्योती कळमकर, प्रमोद निम्हण, प्रकाश बालवडकर, सचिन दळवी, सुभाष भोते, मोरेश्वर बालवडकर, सुस -महाळुंगे अध्यक्ष सचिन पाडाळे, अस्मिता करंदीकर, जागृती विचारे, निकिता माताडे, रिना रायकर, राकेश पाडाळे, अनिकेत चांदेरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















