कोंढवा वाहतूक समस्यांवर विविध विभागांची संयुक्त बैठक ठोस उपाययोजना ठरल्या

कोंढवा, पुणे: कोंढवा परिसरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कोंढवा ट्राफिक समस्या निवारण कृती समिती आणि कोंढवा वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्त्वपूर्ण बैठक आज सिटी लॉन्स, पारगेनगर, कोंढवा येथे पार पडली. या बैठकीचे नेतृत्व कोंढवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी केले.

ही बैठक पोलीस उपायुक्त (वाहतूक) आणि अप्पर पोलीस आयुक्त  मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. बैठकीत कोंढवा परिसरातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक आणि विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या बैठकीला पुणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग, पाणीपुरवठा, पथ, नगर रचना, बांधकाम विभाग, कोंढवा वाहतूक पोलीस विभाग व कोंढवा पोलीस स्टेशन विभाग,  ड्रेनेज विभाग,या सर्व विभागांच्या उपस्थित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून कोंढव्याची वाहतूक समस्या प्रभावीपणे मांडण्यात आली. नागरिकांनी आपल्या भागातील समस्यांचा तपशीलवार आढावा दिला. अधिकारी वर्गाने त्या समस्या गांभीर्याने ऐकून लगेचच त्यावर उपाययोजना काय असू शकतील यावर सकारात्मक चर्चा केली.

कोंढव्यातील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या रस्त्यांवरील अतिक्रमणे, अनधिकृत बाजारपेठा, अपूर्ण रस्ते विकास, ड्रेनेजची कामे, वाहतुकीची चुकीची दिशा, पथदिवे व सिग्नल व्यवस्थेतील त्रुटी इत्यादी मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.

याआधीही कोंढवा ट्रॅफिक समस्या निवारण कृती समितीने अनधिकृत रविवारी बाजार हटविण्याची मागणी वाहतूक पोलीस व अतिक्रमण विभागाकडे केली होती. त्या मागणीनंतर समितीच्या सकारात्मक सहभागामुळेच संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई केली. यामध्ये कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. विनय पाटणकर यांनी पोलीस बंदोबस्त पुरवून महत्त्वाची भूमिका बजावली होती.

या बैठकीसाठी समितीचे अध्यक्ष शेख अजहर कादरी, उपाध्यक्ष जमील शेरेकर, सचिव समीर पठाण, महिला अध्यक्ष नूर जहान शेख यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण सहभाग घेतला.

बैठकीनंतर शेख अजहर कादरी यांनी सांगितले की “कोंढवा ट्रॅफिक समस्या ही केवळ पोलिसांची नव्हे तर संपूर्ण यंत्रणेची व नागरिकांची आहे. आजच्या बैठकीत प्रामाणिकपणे चर्चा झाली आणि ठोस उपाययोजना ठरल्या. लवकरच कोंढवा ट्राफिकमुक्त करून एक राज्यस्तरीय उदाहरण निर्माण करू.”

See also  शरद पवार,अजित पवार व सुप्रिया सुळे भेट नंतर दादा दिल्लीला रवाना