पुणे ः विविध ज्ञानशाखांमधील १०० विषयांवर १०० पुस्तके तयार करण्याचा ‘ज्ञानमाला’ हा प्रकल्प अमृत पुरंदरे यांनी पुरंदरे प्रकाशनातर्फे हाती घेतला आहे. नव्या पिढीला केंद्रस्थानी ठेवून मुलांपासून तरुण आणि पालकांपर्यंत विविध वयोगटांना उपयोगी ठरतील अशा विषयांची निवड करण्यात आली असून या मालिकेतील पहिल्या दहा पुस्तकांचे प्रकाशन शनिवारी झाले.
‘ज्ञानमाला’तील १०० पुस्तके एकाच विषयावरील मालिका नसून, १०० स्वतंत्र विषयांकडे जाणारी १०० दारे असल्याचे पुरंदरे सांगतात. एखाद्या पुस्तकातून निर्माण झालेले कुतूहल दुसऱ्या पुस्तकाकडे घेऊन जावे, अशा पद्धतीने या संचाची रचना करण्यात आली आहे. पुस्तके शक्य तितकी सोपी, सहज समजणारी आणि चित्रमय ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे पुस्तक महोत्सवा चे अध्यक्ष राजेश पांडे म्हणाले,बाबासाहेब पुरंदरे यांना स्मरून इतिहास जसा सर्व तरुणांपर्यंत पोहचवला तसे अमृत पुरंदरे यांच्या लिखाणातून २०४७ चा भारत घडण्यासाठी या पुस्तकांची गरज आहे.जगातील सर्वात तरुण देश भारत असणार आहे या भारतीय तरुणाई पिढी घडण्यासाठी या पुस्तकांचा सकारात्मक भाग होणार आहे.
या प्रकल्पाच्या निर्मिती प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर करण्यात येत आहे. विषय निश्चिती, संशोधन, माहिती संकलन, चित्र निर्मिती आदींसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली जात असून विषयाची दिशा, माहितीची निवड, लेखनाची पद्धत आणि अंतिम मजकुराबाबतचे निर्णय स्वतः घेत असल्याचे पुरंदरे यांनी स्पष्ट केले.
‘ज्ञानमाला’ केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून कुटुंबातील कोणत्याही सदस्याला उपयोगी पडावी, अशी त्यांची संकल्पना आहे. मुलाला एखादा प्रश्न पडल्यास त्याने इंटरनेटवर उत्तर शोधण्याबरोबरच पुस्तक उघडावे, वाचावे, चित्र पाहावे आणि पुढचा प्रश्न विचारावा, अशी अपेक्षा आहे. घरातील मुलांनी पालकांसोबत, आजी-आजोबांनी नातवंडांसोबत ही पुस्तके वाचावीत आणि त्यातून चर्चा व कुतूहल वाढावे, अशी या प्रकल्पामागची भूमिका आहे.
यावेळी बालसाहित्यिका माधुरी पुरंदरे, व्यंगचित्रकार चारुहास पंडित, लेखक अमृत पुरंदरे, किशोर पंपाचे चेअरमन किशोर देसाई, पुणे पुस्तक महोत्सवाचे अध्यक्ष राजेश पांडे, सुरेश चाफेकर,किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे आदी उपस्थित होते.
















