औंध : औंध येथील भारतरत्न पं. भीमसेन जोशी रंगमंदिरात १३ व्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव २०२६ ला शुक्रवारी (२ ऑक्टोबर) उत्साहात सुरुवात झाली. पुणे महानगरपालिका आणि पं. भीमसेन जोशी सभागृहाच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाचे उद्घाटन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि वीणावादिनी सरस्वती मातेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी औंध परिसरातील नागरिक, संगीतप्रेमी आणि मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी अभिजात भारतीय संगीताचा सुरेल आविष्कार अनुभवण्याची संधी रसिकांना मिळाली. प्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी यांच्या गायनाने मैफलीत रंग भरला. उस्ताद अक्रम खान आणि जरघम खान यांच्या तबला जुगलबंदीने तालवादनाची अनोखी अनुभूती दिली. तसेच दीपिका भिडे भागवत यांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
औंधच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या संगीत महोत्सवाला पहिल्याच दिवशी संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शास्त्रीय संगीताच्या परंपरेचा वारसा जपत नव्या पिढीपर्यंत अभिजात संगीत पोहोचवण्याच्या दृष्टीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या ४ ऑक्टोबर रोजीही हा महोत्सव सुरू राहणार असून, संगीतप्रेमींसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. जास्तीत जास्त रसिकांनी या संगीत महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन औंध सोशल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व पुणे महापालिकेच्या नगरसेविका भक्ती अजीत गायकवाड आणि फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत सुभाषदादा गायकवाड यांनी केले आहे.
















