डबल डेकर नको, मिनी बस घ्या – माजी नगरसेवक सनी निम्हण यांची मागणी

पुणे, ता. ८ – पीएमपी साठी वातानुकूलित ई डबल डेकर बस खरेदी करण्याची योजना ही धोरणात्मक चूक ठरणार असून, त्या ऐवजी मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांना पूरक ठरणाऱ्या मिनी बसगाड्या खरेदी कराव्यात , अशी मागणी माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी केली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , यांच्याकडे त्यांनी याबाबतचे निवेदन पाठविले आहे. पीएमपी प्रशासनाने या प्रस्तावाचा फेरविचार करावा, अशी सूचना त्यांनी पीएमपीचे अध्यक्ष संजय कोलते यांना केली आहे.
निम्हण म्हणाले, पुण्यात तीन मार्गावर सुमारे 56 किलोमीटर अंतरावर मेट्रो रेल्वे सुरू होत असून, त्याचा विस्तार होणार आहे . पुण्यात दोन्ही महापालिकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठिकठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे जाळे विणले आहे. मेट्रोचे पूल, उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग यामधून डबल डेकर धावण्यासाठी लांब पल्ल्याचे मार्ग उपलब्ध होणार नाहीत. मेट्रोच्या पुलामुळे मुठा नदीवरील पुलावरून डबल डेकर बस जाऊ शकणार नाही. सोलापूर रस्ता, सिंहगड रस्ता , सातारा रस्ता, कर्वे रस्ता येथे उड्डाणपुणामुळे डबल डेकरला जाता येणार नाही. त्या मार्गावर मेट्रोचाही प्रस्ताव आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठा मधून ती धाऊ शकणार नाही. तशीच परिस्थिती पिंपरी चिंचवड शहरात आहे.

निम्हण म्हणाले, डबल डेकर बस सेवा निरुपयोगी ठरते आहे असे लक्षात आल्याने तीन दशकांपूर्वी तत्कालीन पीएमटी प्रशासनाने डबल डेकर बस सेवा बंद केली. त्यानंतर शहरात उड्डाणपूलाचे जाळे झाल्याने या गाड्या आता धावू शकणार नाहीत . दुसरी बाब म्हणजे बीआरटी बस सेवा सुरू करताना दहा वातानुकूलित गाड्या घेतल्या होत्या . मात्र आर्थिक दृष्ट्या त्या चालविणे परवडत नसल्याने त्या बंद केल्या. शेवटी त्या भंगारात विकावे लागल्या. ३३ कोटी खर्च करुन सात आठ वर्षांपूर्वी तयार केलेला नगर रस्त्यावरील बी.आर.टी. मार्ग पुन्हा काढायचे काम म.न.पा ने हाथी घेतले आहे.


निम्हण पुढे म्हणाले, सुमारे 70 ते 80 कोटी रुपये खर्चून 20 डबल डेकर बस खरेदी करण्याऐवजी तेवढ्याच किमतीत सुमारे 100 मिनी बस गाड्या खरेदी करता येतील . मेट्रो स्थानकापासून चार-पाच किलोमीटर अंतरावर गर्दीच्या भागात जाण्यासाठी प्रवाशांना त्या उपयुक्त ठरतील. त्यामुळे या प्रस्तावाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून पुणे शहरातील प्रवाशांना उपयुक्त ठरतील अशा गाड्या खरेदी कराव्यात अशी मागणी सनी निम्हण यांनी केली आहे.

See also  बाणेर येथील औरेलिया हाउसिंग सोसायटी मध्ये श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात