सुस रोडवरील डंपरला अचानक आग; वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

बाणेर : सुस रोडवरून सुसगावच्या दिशेने खडीची वाहतूक करणाऱ्या डंपरला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. एमएच १२ एसएक्स ९८६६ या ट्रकला आग लागल्यानंतर तो सुस रोडवरील महामार्गाच्या पुलावर आला होता.

ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी ट्रक थांबविण्यासाठी प्रयत्न केले. घटनेची माहिती मिळताच बावधन वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रस्त्यावरून जात असलेला पाण्याचा टँकर थांबवून त्याच्या मदतीने ट्रकला लागलेली आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरण्यापूर्वीच नियंत्रण मिळविण्यात यश आले.

दरम्यान, बाणेर अग्निशामक दलाचे जवानही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग पूर्णपणे आटोक्यात आणली. वाहतूक पोलिस आणि अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

ट्रकला लागलेल्या आगीमुळे सुस रोड तसेच महामार्गाच्या पुलाच्या परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही काळ या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. आग आटोक्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले.

See also  शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे