पुण्यातील विद्यार्थ्यांचे पासपोर्ट अवघ्या २४ तासांत जारी! NASA आणि ESA च्या शैक्षणिक भेटीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पासपोर्ट कार्यालयाचा दिलासा

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील NASA (नासा) आणि ESA (युरोपियन स्पेस एजन्सी) यांच्या शैक्षणिक भेटीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पासपोर्ट प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांच्याकडून अवघ्या २४ तासांत जारी करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दौऱ्याला गती मिळावी, या उद्देशाने पासपोर्ट कार्यालयाने ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केली.

परराष्ट्र मंत्रालयाच्या स्टुडंट्स अँड मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स एंगेजमेंट प्रोग्राम (SAMEEP) अंतर्गत १४ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकूण ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

पुण्याचे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पासपोर्टचे महत्त्व, आंतरराष्ट्रीय प्रवासाची प्रक्रिया आणि परदेशात उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संधींबाबत मार्गदर्शन केले. विविध देशांच्या संस्कृतींचा अभ्यास, जागतिक घडामोडींची माहिती आणि व्यापक दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्वही त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांचे कौतुक केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे तसेच शिक्षक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दौऱ्याच्या दृष्टीने पासपोर्ट जारी करण्याची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्यात आली. पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिककेंद्रित सेवा देण्याच्या भूमिकेतून पासपोर्ट कार्यालयाने अवघ्या २४ तासांत पासपोर्ट जारी केले.

या यशाबद्दल पासपोर्ट कार्यालयाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचा शैक्षणिक दौरा ज्ञानवर्धक, समृद्ध आणि संस्मरणीय ठरो, अशा शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संधींचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

See also  परदेशात स्थलांतरीत झालेली बुद्धीवान पिढी पुन्हा भारतात येण्याचा काळ येईल- राज्यपाल