पुणे ग्रँड टूर २०२७ च्या पार्श्वभूमीवर रस्ते, पदपथ व सायकल मार्गांच्या विकासाला गती

पुणे : पुणे ग्रँड टूर २०२७ च्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते, पदपथ, चौक, सायकल मार्ग आणि पादचारी सुविधांच्या विकासकामांना गती देण्यात येणार आहे. बाणेर रोड व गणेशखिंड रोडवरील प्रलंबित कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासह रस्त्यांच्या दर्जा व टिकाऊपणाबाबत कोणतीही तडजोड करू नये, असे निर्देश पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले. युटिलिटी चरांचे पुनर्भरण आणि मॅनहोल समपातळीकरणाच्या कामांमध्ये निकृष्ट दर्जा आढळल्यास संबंधित कंत्राटदार आणि देखरेख करणाऱ्या अभियंत्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुणे ग्रँड टूर २०२७ च्या पूर्वतयारीसह शहरातील रस्ते विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर पोलीस आयुक्त (वाहतूक) मनोज पाटील, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) प्रजीत नायर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, संबंधित विभागांचे खातेप्रमुख आणि टाटा प्रोजेक्ट्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बाणेर व गणेशखिंड रस्त्यांची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश
पुणे ग्रँड टूर २०२७ च्या सुमारे ४.५ किलोमीटर मार्गावरील मध्य दुभाजकांची दुरुस्ती आणि उर्वरित कामे ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश टाटा प्रोजेक्ट्सला देण्यात आले आहेत. तसेच बाणेर रोड आणि गणेशखिंड रोडवरील उर्वरित कामे व आवश्यक सुधारणा ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे.

संचेती रुग्णालय ते बालेवाडी या मार्गावरील बांधकामाचा राडारोडा, अतिरिक्त साहित्य आणि अनावश्यक अडथळे हटविण्यासाठी पुणे महानगरपालिका व टाटा प्रोजेक्ट्स यांनी संयुक्त स्वच्छता मोहीम राबवावी, असे निर्देश देण्यात आले. कामे पूर्ण झालेल्या ठिकाणचे अनावश्यक साहित्य, सुरक्षा बॅरिकेड्स आणि फलक एका आठवड्यात हटविण्याचेही सांगण्यात आले.

पुणे ग्रँड टूरच्या मार्गावरील पदपथ, पादचारी सुविधा, सायकल मार्ग आणि सार्वजनिक जागांचे सुशोभीकरण यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आवश्यक पदपथांची दुरुस्ती करून नागरी रस्ते रचना मार्गदर्शक तत्त्वांनुसार (USDG) कामांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

See also  धानोरी जकात नाका रोडवरील खड्डे त्वरित दुरुस्ती करा - आम आदमी पार्टी

वाहतूक पोलिसांनी निदर्शनास आणून दिलेल्या पाच महत्त्वाच्या चौकांमध्ये तसेच यू-टर्नच्या ठिकाणी आवश्यक सुधारणा ग्रँड टूरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. मार्गावरील मेट्रो उड्डाणपुलाचे रंगकाम महापालिकेच्या नियुक्त कंत्राटदारामार्फत, तर उर्वरित भागाचे रंगकाम टाटा प्रोजेक्ट्समार्फत करण्यात येणार आहे. आवश्यक ठिकाणी तात्पुरती प्रकाशव्यवस्थाही केली जाणार आहे. चौक सुधारणा, प्लेसमेकिंग आणि सुशोभीकरणाच्या कामांमध्ये संबंधित बांधकाम व्यावसायिक व आस्थापनांचा सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (CSR) माध्यमातून सहभाग घेण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.

रस्त्यांचे वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी युटिलिटी चरांचे पुनर्भरण आणि मॅनहोल समपातळीकरणाच्या कामांसाठी तयार केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची (SOP) काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.चर योग्य पद्धतीने न बुजविणे, निकृष्ट दर्जाचे पुनर्भरण आणि मॅनहोलची पातळी योग्य नसणे यामुळे रस्त्यांची अल्पावधीत दुरवस्था होते. त्यामुळे अशा कामांची गुणवत्ता तपासून त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदार आणि कामावर देखरेख करणाऱ्या महापालिका अभियंत्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश विभागप्रमुखांना देण्यात आले.

यापूर्वी करण्यात आलेल्या आणि त्यानंतर खराब झालेल्या युटिलिटी चर व मॅनहोलच्या कामांची ठिकाणनिहाय तपासणी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच कनिष्ठ अभियंते, पर्यवेक्षक आणि कंत्राटदारांसाठी नियमित तांत्रिक प्रशिक्षण आयोजित करण्यावर भर देण्यात आला.

७५ किलोमीटरचे सलग सायकल मार्ग विकसित करण्याचे उद्दिष्ट

बैठकीत ITDP संस्थेमार्फत पुणे शहरातील प्रस्तावित ७५ किलोमीटर सायकल मार्गांच्या जाळ्याबाबत सादरीकरण करण्यात आले. सध्या अस्तित्वात असलेल्या सायकल मार्गांमधील तुटक जोडणी आणि अपूर्ण दुवे दूर करून सलग, सुरक्षित व वापरण्यायोग्य सायकल मार्ग विकसित करण्याचे निर्देश पथ विभागाला देण्यात आले. ही कामे पुणे ग्रँड टूर २०२७ च्या विकासकामांशी समन्वय साधून करण्यात येणार आहेत.पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने होणारी विकासकामे केवळ स्पर्धेपुरती मर्यादित न राहता त्यांचा दीर्घकालीन लाभ पुणेकरांना मिळावा, हा महापालिकेचा उद्देश आहे. रस्ते अधिक सुरक्षित व टिकाऊ करणे, पादचारी आणि सायकलस्वारांसाठी सक्षम सुविधा निर्माण करणे तसेच रस्त्यांचे वारंवार होणारे नुकसान आणि खड्ड्यांची समस्या कमी करण्यावर महापालिका भर देणार आहे.