औंध : दिव्यांग व्यक्तींमधील कलागुणांना वाव मिळावा, त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्यांना स्वावलंबनासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने मायबोली सक्षमता फाउंडेशन या नोंदणीकृत सामाजिक संस्थेतर्फे औंध परिसरातील विविध गृहनिर्माण संस्थांमध्ये दिव्यांगांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या उपक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट देत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
या प्रदर्शन सुरूवात औंध येथील एकदंत विहारमधील दत्त मंदिरापासून झाली. त्यानंतर दि. अॅड्रेस सोसायटी, सुवर्णयुग सोसायटी, रोहन निलय सोसायटी, डीएसके आकाशगंगा आणि कुमार प्रेरणा या गृहनिर्माण संस्थांमध्ये प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनांना महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, नगरसेविका सपना छाजेड व अमृता मेहत्रे, माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, दिव्यांगांसाठी कार्यरत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अनुराधा फातरफोड आणि मधुरा सनी निम्हण यांनी भेट दिली. यावेळी मायबोली सक्षमता फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रीती शिरोडे या दिव्यांग व्यक्तींसाठी करत असलेल्या कार्याचे मान्यवरांनी कौतुक केले.
दरम्यान, १९ ऑक्टोबर रोजी अष्टमीचे औचित्य साधून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारातील विशेष मुलांसाठी कार्यरत असलेल्या अंकुर विद्यामंदिर येथे कन्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेच्या संस्थापक माधुरी देशपांडे, मुख्याध्यापिका अमृता जोशी, फाउंडेशनचे सचिव देवराज लिगाडे, खजिनदार राजेंद्र शिरोडे आणि सभासद वैदेही जोशी उपस्थित होते.
दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या कौशल्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्याविषयी समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी मायबोली सक्षमता फाउंडेशनचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
















