बावधन : बावधन परिसरातील सर्व्हे क्रमांक २६, २७ व ३३ मधून वाहणारा नैसर्गिक नाला बुजवून त्यावर रस्ता तयार करण्यात आल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची पुणे महापालिका प्रशासनाने दखल घेतली आहे. बांधकाम विकास विभागाच्या उपअभियंता मुकुंद बर्वे व बांधकाम निरीक्षक अजय फाले यांनी घटनास्थळी पाहणी करून संबंधित प्रकाराची माहिती घेतली.
नाला बुजवून त्यावर रस्ता केल्यामुळे पावसाळ्यात नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडून परिसरात पाणी साचण्याची तसेच भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली होती. नाल्यात राडारोडा व मातीचा भराव टाकण्यात आल्याने जलप्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याचेही निदर्शनास आले होते.
या पार्श्वभूमीवर महापालिका अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. नाल्याची सद्यस्थिती, करण्यात आलेला भराव आणि तयार करण्यात आलेल्या रस्त्याची पाहणी करून आवश्यक माहिती घेण्यात आली. संबंधित प्रकरणाची कागदपत्रे व परवानग्यांची तपासणी करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नाल्यावरील अतिक्रमण अथवा अनधिकृत भरावामुळे भविष्यात नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाकडून प्रत्यक्षात कोणती कारवाई केली जाते, याकडे बावधनकरांचे लक्ष लागले आहे.















