५०० कोटींच्या आरोपांप्रकरणी एकनाथ शिंदेंची नार्को टेस्ट करा; ‘आप’ची मागणी; मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी षडयंत्र रचले जात होते का? डॉ. अभिजीत मोरे यांचा सवाल

पुणे : मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिप आणि भाजप व एकनाथ शिंदे यांच्यातील कथित ५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराच्या आरोपांवरून आम आदमी पार्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करून संबंधित ऑडिओ क्लिपची सत्यता स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासावी, अशी मागणी ‘आप’चे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. अभिजीत मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावले असले, तरी कथित ऑडिओ क्लिप नेमकी कुठून आली आणि त्यामध्ये कोणाचा सहभाग आहे, याचा तपास होणे आवश्यक असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. कथित ५०० कोटी रुपये कोणी आणि कशा प्रकारे दिले, याचाही शोध घेण्याची मागणी त्यांनी केली.

मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला कमकुवत करण्यासाठी किंवा आंदोलनातील नेत्यांना बदनाम करण्यासाठी राजकीय डावपेच आखले गेले होते का, असा सवालही मोरे यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला चिरडण्यासाठी पैशांचा वापर केला जात होता का, तसेच भाजपच्या बैठकीत जरांगे पाटील यांच्यापर्यंत ५०० कोटी रुपये पोहोचल्याची चर्चा का झाली, याची उत्तरे जनतेसमोर यावीत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

या संपूर्ण प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

See also  परिवर्तन महाशक्ती व महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा महायुतीला मोठा धक्का, माजी खासदार शिवाजी माने यांचा प्रवेश