पुणे महापालिकेच्या आणखी आठ शाळा होणार CBSE; शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या शैक्षणिक व्यवस्थेला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या अंतर्गत आठ नवीन सीबीएसई (CBSE) शाळा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) प्राप्त झाले आहे. या निर्णयामुळे शहरातील सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आगामी २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून या शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना केंद्रीय अभ्यासक्रमाचा परिचय व्हावा, तसेच राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी त्यांचा शैक्षणिक पाया भक्कम व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इंग्रजी माध्यमातून CBSE अभ्यासक्रम उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अधिक संधी मिळण्यास मदत होणार आहे. JEE, NEET, NDA यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीही या अभ्यासक्रमाचा उपयोग होऊ शकतो.

या आठ शाळांमध्ये ए. पी. जे. कलाम शाळा (कर्वेनगर), ६२ बी (वानवडी), रामचंद्र बनकर शाळा (हडपसर-मांजरी), लहुजी साळवे शाळा (येरवडा), ८३ बी (हडपसर), १०२ जी (धानोरी), २०३ बी (वडगाव बुद्रुक) आणि नवीन शाळा (कोंढवा) यांचा समावेश आहे.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिक्षक भरती, शैक्षणिक नियोजन, अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, आवश्यक पायाभूत सुविधा आणि शाळा व्यवस्थापन याबाबत चर्चा करण्यात आली.

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सरकारी आणि महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

See also  पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाणेरमध्ये पूनम विशाल विधाते व प्रमोद अण्णा निम्हण यांचे शक्तीप्रदर्शन