पुणे : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या दुतर्फा हिरवाई फुलवून परिसराचे सौंदर्य वाढविण्यासाठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि सुशोभीकरणाची कामे हाती घ्यावीत. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगरसेवक अमोल रतन बालवडकर यांनी केली आहे.
बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण आणि सुतारवाडी या परिसरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागा उपलब्ध आहेत. विशेषतः पाषाण तलाव ते मुळा नदीदरम्यानच्या सुमारे साडेपाच ते सहा किलोमीटरच्या पट्ट्यात वृक्षारोपण आणि सुशोभीकरणासाठी अनुकूल जागा आहे. या जागेचा नियोजनबद्ध वापर करून विविध प्रकारची झाडे, फुलझाडे लावावीत, त्यांचे योग्य संवर्धन करावे तसेच महामार्गालगतच्या भिंतींवर आकर्षक चित्रे रेखाटून परिसराचे सौंदर्य वाढवावे, अशी नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
या मागणीची दखल घेत अमोल बालवडकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन दिले आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना हरित पट्टा विकसित केल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागेल. तसेच नागरिकांना अधिक स्वच्छ, सुंदर आणि हिरवागार परिसर अनुभवता येईल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक निधी मंजूर करावा आणि वृक्षारोपण व सुशोभीकरणाची कामे लवकरात लवकर सुरू करावीत, अशी अपेक्षा अमोल बालवडकर यांनी व्यक्त केली आहे.
– पुणे बुलेटिन
















