रस्ते मोकळे करायचे असतील तर आधी भाजी मंडई सुरू करा; आयुक्तांना थेट सवाल! उपनगरात दहा-पंधरा वर्षांपासून भाजी मंडई धूळखात

पुणे : पुणे शहरात अनधिकृत अतिक्रमणे आणि बांधकामांविरोधात पुणे महानगरपालिका आयुक्तांनी धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असतानाच, दुसरीकडे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या भाजी मंडई मात्र अनेक वर्षांपासून वापराविना पडून असल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुणे महानगरपालिकेने शहरातील विविध उपनगरांमध्ये भाजी विक्रेत्यांसाठी सुसज्ज भाजी मंडई उभारल्या आहेत. मात्र, यातील अनेक मंडई बांधून पूर्ण होऊन दहा ते पंधरा वर्षे उलटली तरी त्यांचा प्रत्यक्ष वापर सुरू झालेला नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च करूनही फुटपाथवर आणि रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या भाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही.

एकीकडे रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई केली जात असताना दुसरीकडे रस्त्यांवरच नियमितपणे आठवडे बाजार भरत आहेत. परिणामी वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि अतिक्रमणांचा प्रश्न कायम आहे. बांधून तयार असलेल्या भाजी मंडई सुरू झाल्यास विक्रेत्यांना हक्काची जागा उपलब्ध होण्यासोबतच रस्ते आणि फुटपाथ मोकळे होण्यास मदत होऊ शकते.

त्यामुळे उपनगरांमध्ये बांधून तयार असलेल्या भाजी मंडई नेमक्या कधी सुरू होणार, त्यांचे वाटप कधी होणार आणि विक्रेत्यांचे पुनर्वसन कधी होणार, याचे उत्तर महापालिका प्रशासनाने द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आधी बांधलेल्या मंडईंचा पूर्ण क्षमतेने वापर सुरू करावा आणि त्यानंतरच नव्या भाजी मंडईंच्या कामांना मंजुरी द्यावी, अशीही भूमिका मांडली जात आहे.

अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेणारे महापालिका आयुक्त बंद अवस्थेतील भाजी मंडई सुरू करण्यासाठीही तितकीच तत्परता दाखवणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. तयार असलेल्या मंडईंमध्ये भाजी विक्रेत्यांना गाळ्यांचे वाटप करून त्या तातडीने सुरू करण्याची ठोस भूमिका आयुक्तांनी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

See also  औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील स्वयंसेवी संस्थांच्या तीन जागांसाठी चुरस; १९ पैकी १८ अर्ज पात्र; भाजपाचे सहा, राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक असल्याने निवडीकडे लक्ष