सुस : औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक रस्ते, पदपथ व फ्रंट मार्जिनवरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सूस गाव रस्त्यावरील मोठ्या प्रमाणातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली.
महापालिकेचे उप आयुक्त सोमनाथ बनकर (अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग), उप आयुक्त अविनाश सपकाळ (परिमंडळ क्र. २) तसेच सहायक आयुक्त इंद्रायणी करचे (औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय) यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान एकूण ३६ शेड, १२ स्टॉल, ९ काऊंटर आणि सुमारे ४१,५०० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत कच्चे व पक्के बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच दुकानांबाहेर अनधिकृतपणे लावण्यात आलेले बोर्ड, बॅनर व इतर जाहिरात साहित्यही हटविण्यात आले.
कारवाईसाठी उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, विभागीय अतिक्रमण अधिकारी, ५ अतिक्रमण निरीक्षक, २ महापालिका पोलीस, ५ एमएसएफ जवान, १९ बिगारी सेवक, १ जेसीबी, १ गॅस कटर आणि २ ओपन ट्रक असा आवश्यक अधिकारी, कर्मचारी व यंत्रसामग्रीचा ताफा तैनात करण्यात आला होता.
बांधकाम विकास विभाग, झोन क्र. ३ यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे सूस गाव रस्त्यावरील सार्वजनिक जागांमधील अतिक्रमणे हटविण्यात आली असून, रस्ते व पदपथ मोकळे करण्यासाठी महापालिकेने कारवाई केली.
















