साई चौक, बालेवाडी, येथील कचरा डेपो हटविण्याच्या मागणीला यश; बाणेर – बालेवाडी नागरीक मंच (BBNM) चे २८ नोव्हेंबरचे उपोषण स्थगित

बालेवाडी : बाणेर-बालेवाडी नागरिक मंचाने (BBNM) साई चौक, आर. के. लक्ष्मण मेट्रो स्टेशनजवळील मोठ्या कचरा डेपोचा प्रश्न मार्गी न लागल्यास २८ नोव्हेंबर २०२६ रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. २७ नोव्हेंबरपर्यंत हा कचरा हटविण्याची मागणी करण्यात आली होती.

या प्रश्नावर BBNM आणि स्थानिक रहिवासी गेल्या काही काळापासून सातत्याने पाठपुरावा करत होते. विविध स्तरांवर बैठका घेऊन तसेच पत्रव्यवहार करून हा प्रश्न महापालिकेच्या निदर्शनास आणून दिला होता.याची तातडीने दखल घेत पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने आणि औंध क्षेत्रीय कार्यालयाने कचरा हटविण्याचे काम सुरू केले. गेल्या १० दिवसांत सुमारे ७० टन कचरा उचलून परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला आहे.

औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त सौ. इंद्रायणी करचे-गायकवाड आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संपूर्ण पथक साई चौक येथे आले होते. त्यांनी BBNM सदस्यांशी संवाद साधून काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. तसेच संबंधित जागेला पत्र्याचे कुंपण घालण्यासाठी तरतूद करण्यात आल्याचेही सांगितले.

महापालिकेच्या या तातडीच्या कार्यवाहीबद्दल शेजारील Marvel Breeza सोसायटीतील रहिवासी आणि BBNM सदस्यांनी उपस्थित राहून अधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी BBNM चे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कारवाईमुळे परिसरातील रहिवासी, पादचारी आणि मेट्रो प्रवाशांना दुर्गंधी पासून मोठा दिलासा मिळाला आहे. BBNM च्या मागण्या पूर्ण झाल्यामुळे २८ नोव्हेंबर रोजी होणारे नियोजित उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

See also  भवानी पेठ पालखी मुक्काम स्थळाच्या सोयी-सुविधांची पाहणी संपन्न; प्रशासकीय सज्जतेवर भर