नागरिकांना विकासाची हमी देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा घरोघरी-केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे

पुणे :- स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करत असताना २०४७ पर्यंत देशाचा समावेश विकसित देशांच्या यादीत केला जावा हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून देशातील नागरिकांना विकासाची हमी देण्यासाठीच विकसित भारत संकल्प यात्रा घरोघरी पोहोचत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केले.

पुण्यातील धनकवडी परिसरात विकसित भारत संकल्प यात्राअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार भीमराव तापकीर, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, उपायुक्त आशा राऊत, उपायुक्त नितीन उदास आदी उपस्थित होते.

श्री.चौबे म्हणाले, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या लाभापासून वंचित नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्याचे काम विकसित भारत संकल्प यात्रेमार्फत करण्यात येत आहे.देशभरातील वंचित आणि गरीब प्रवर्गातील लाखो नागरिक या यात्रेचा लाभ घेत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेचा हा रथ म्हणजे केवळ संकल्प यात्रा नसून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहचण्याची हमी असल्याचे चौबे यावेळी म्हणाले.

आमदार तापकीर म्हणाले, केंद्र शासनाने गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात अनेक लोकोपयोगी योजनांची सुरुवात केली आहे. कोणत्याही लाभार्थ्याला शासकीय योजनेचा लाभ थेट त्याच्या बँक खात्यात देण्यात येतो.

कार्यक्रमादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री चोबे यांनी यावेळी विविध स्टॉलना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. या निमित्ताने काही लाभार्थ्यांना मंत्री महोदयांच्या हस्ते विविध योजनांची प्रमाणपत्रे, स्वनिधी योजनेचा धनादेश आणि गॅस कनेक्शन यांचे वाटपही करण्यात आले.

श्री. खेमनार यांनी प्रास्ताविकात महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. विकसित भारत संकल्प यात्रेत केवळ केंद्र सरकारच्याच नव्हे तर राज्य सरकारच्या तसेच पुणे महानगरपालिकांकडून राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री स्वानिधी योजना, उज्वला योजना, आयुष्मान भारत योजना यांच्यासह आधार कार्ड नोंदणी-दुरुस्ती, डिजिटल रेशन कार्ड, आरोग्य तपासणी यांसारखे अनेकविध योजनांचे शिबीर लावण्यात आले होते. अनेक नागरिकांनी यावेळी या योजनांसाठी नोंदणी केली.

See also  ओबीसी तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील मुलींची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासन करणार - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील