संत ज्ञानेश्वर नगर येथील रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करून नागरिकांना घरे देण्यात यावी -माजी आमदार मेधा कुलकर्णी

कोथरूड: संत ज्ञानेश्वर नगर एरंडवणा येथील सुमारे 7 वर्षे रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात त्रस्त नागरिकांशी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी संवाद साधून जागा पाहणी केली. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांची माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी भेट घेऊन चर्चा केली व निवेदन देत कारवाईची मागणी केली.

यावेळी त्रस्त झालेल्या नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. पुनर्वसन प्रकल्प रखडल्याने या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. हा प्रकल्प तातडीने करण्यात यावा अशी मागणी यावेळी महिलांनी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची भेट घेऊन व्यक्त केली.

संत ज्ञानेश्वर नगर एरंडवणा येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प 2017 साली सुरू झाला होता. या प्रकल्पाचे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत असून नागरिकांना घराचे ताबे मिळालेले नाहीत. स्थलांतरित नागरिकांना बाहेर राहावे लागते या नागरिकांच्या घराचे भाडे सदर बांधकाम व्यावसायिक देत नाही. यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

या प्रकल्पामध्ये मूळ नऊ हक्कदारांना घरे देण्यात आलेली नाहीत. तर पंधरा बाहेरील नागरिकांना घरे देण्यात येत असल्याचे कळत असल्याने याची चौकशी होणे आवश्यक आहे. अनेकदा प्लॅन रिवाईज करण्यात आला असून यावर जागा मालकांच्या सह्या घेण्यात आलेल्या नाहीत. मूळ पुनर्वसनाच्या नागरिकांना जागा देण्या अगोदरच खाजगी झुडिओ मॉलला ताबा देण्यात आला आहे.

तरी या सर्व प्रकल्पाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे तातडीने देण्यात यावीत अशी मागणी यावेळी कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केली.

See also  भुकूूम मठातील किर्तन महोत्सवला मोठा प्रतिसाद