सातारा गॅझेट लागू न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा – मनोज जरांगे पाटील

पुणे  : वरकुटे (ता. करमाळा) येथे शहीद जवान नवनाथ गात यांच्या २३ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सातारा संस्थान गॅझेट संदर्भात सरकारला स्पष्ट इशारा दिला. सात तारखेपर्यंत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर पुन्हा आंदोलन छेडावे लागेल, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले.

जरांगे-पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे राज्यातील अनेक गरजू कुटुंबांना दिलासा मिळत आहे आणि ही लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. सातारा आणि कोल्हापूर संस्थान गॅझेटचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर राज्यातील वंचित समाजघटकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. त्यामुळे सरकारने वेळ न दवडता योग्य निर्णय घ्यावा, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड. डॉ. बाबूराव हिरडे यांनी भूषविले. यावेळी आमदार नारायण पाटील, तहसीलदार शिल्पा ठोकडे, जिल्हा परिषद सदस्या रश्मी बागल, गणेश करे-पाटील, देविदास ताकमोगे, योगेश दळवी, आक्रूर शिंदे, अण्णासाहेब ढाणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

गेल्या २३ वर्षांपासून शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याबद्दल जरांगे-पाटील यांनी स्मारक समिती व ग्रामस्थांचे कौतुक केले. शहीदांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाजहिताची कामे करणे, हीच खरी आदरांजली असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे, सांगोला येथील रावसाहेब साळुंके (शौर्य पुरस्कार), आदलिंग वस्ती शाळा कोंढेज (आदर्श शाळा पुरस्कार), शिवम अण्णासाहेब ढाणे (क्रीडा पुरस्कार) तसेच प्रा. डॉ. संदीप ओहोळ यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात ८५ जणांनी रक्तदान केले. रक्तसंकलनाचे कार्य रामभाई शहा रक्तपेढी (बार्शी) आणि श्री कमला भावनी रक्तपेढी (करमाळा) यांच्या वतीने पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीतांनी करण्यात आली. सूत्रसंचालन सचिन गाडेकर यांनी केले, तर प्रस्ताविक नीलकंठ ताकमोगे यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. आभार प्रदर्शन सचिन गात व नागनाथ गात यांनी केले.

See also  राष्ट्रवादीचा हा अंतर्गत चित्रपट, सिनेमाचा एंड होत नाही तोपर्यंत काय प्रतिक्रिया द्यायची - देवेंद्र फडणवीस

आपल्या भाषणात जरांगे-पाटील यांनी एकजूट आणि कष्ट यांच्याच बळावर समाजातील आर्थिक अडचणी, बेरोजगारी, व्यसनाधीनता आणि सामाजिक विसंवाद यांसारख्या समस्यांवर मात करता येईल, असा विश्वास व्यक्त केला.