राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 16 सदस्य कोर कमिटीने शरद पवार यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळून लावला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला पदाचा राजीनामा पक्षाच्या १६ सदस्यीय कोर कमिटीने फेटाळून लावला. पवारसाहेबांनी पक्षाला विश्वासात न घेता राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांची विनंती लक्षात घेता, पक्षाने पवारसाहेबांचा राजीनामा नामंजूर केला आहे. त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करावा, अशी पक्षाने त्यांना विनंती केली आहे. पक्ष व देशाला पवारसाहेबांची गरज असून, त्यांनी आपल्या पदावर कायम रहावे. केवळ पक्षांतर्गतच नाही तर अन्य राजकीय पक्षांनीदेखील शरद पवार यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावे, अशी विनंती केली आहे. या सर्व बाबी पाहाता, पक्षाच्या १६ सदस्यीय कोर कमिटीच्या बैठकीत पवारसाहेबांनी दिलेला राजीनामा नामंजूर करण्याचा निर्णय एकमताने घेतला असल्याची माहिती कोर कमिटीचे सदस्य तथा पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पटेल यांच्या या माहितीनंतर यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर आंदोलन करणारे कार्यकर्ते व पदाधिकारी, नेते यांनी जल्लोष केला.

पक्षाच्या काेर कमिटीने मंजूर केलेल्या ठरावावर शरद पवार यांनी विचार करण्यास वेळ मागितला आहे. प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. तातडीने निर्णय घेण्याची विनंती शरद पवार यांना करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. शरद पवार यांनी काेर कमिटीतील सदस्यांचे म्हणने ऐकून घेतले आहे. त्यामुळे ते आता निर्णय घेणार आहेत. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती त्यांना करण्यात आली. देशभरात शरद पवार यांनी अध्यक्ष पदावर कायम राहावे, अशी मागणी होत आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

See also  शासकीय काम वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी मंत्रालय मध्यवर्ती टपाल स्वीकृती केंद्र – अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक