ना आश्वासन, ना तारीख थेट संवाद द्वारे जागेवर निर्णय,पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोथरुडमधील उपक्रमाचा तिसरा टप्पा

कोथरूड : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या ‘थेट भेट’ उपक्रमाच्या माध्यमातून आज कोथरुडमधील थोरात गार्डन येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर ना आश्वासन, ना तारीख थेट जागेवर निर्णय देत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुडमधील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी थेट भेट उपक्रम सुरू केला असून, आज या उपक्रमातील तिसऱ्या टप्प्यातील कार्यक्रम कोथरुडमधील थोरात गार्डन येथे झाला. यावेळी उद्यानात येणाऱ्या नागरिकांनी आपल्या तक्रारी नामदार चंद्रकांत पाटील यांच्या समोर मांडल्या.

यात प्रामुख्याने लहान मुलांसाठी बालनाट्याचा कार्यक्रमाचे आयोजन, उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर उद्यानातील डायनासोर पुन्हा कार्यान्वित करणे, स्वच्छता गृहातील दिवे यांसह टवाळखोर तरुणांवर चाप बसवणे आदी समस्या मांडल्या. कोल्हापूरच्या धर्तीवर कोथरुड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या टेरेसवर तारांगण उभारावे, अशी अपेक्षा काही नागरिकांनी व्यक्त केली.

त्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सर्व समस्या निवारण करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या टेरेसवर तारांगण साकारण्यासाठी आयुक्तांशी चर्चा करुन त्याची अंमलबजावणी करु, अशी ग्वाही दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यतत्परतेवर नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

See also  बाणेर बालेवाडी भागात हिंदू नववर्ष निमित्ताने शोभायात्रा