लाक्षणिक हेल्मेट दिवशी लक्षणीय प्रबोधन पुणेकरांकडून उपक्रमाची प्रशंसा

पुणे : हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून आज जिल्ह्यात लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्यात आला. प्रादेशिक परिवहन विभाग आणि पुणे शहर वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने सकाळपासूनच चौकाचौकात, शासकीय, निमशासकीय आस्थापनांच्या परिसरात हेल्मेटधारी दुचाकीस्वारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत तर विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे प्रबोधन आणि प्रसंगी दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी, जनतेस मार्गदर्शक ठरावे आणि स्वतःच्या व सहप्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेट परिधान करून लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले होते. त्या अनुषंगाने आज शहरात सर्वत्र परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्यावतीने प्रबोधन करण्यात आले.

प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने शहरातील सर्व राज्य शासकीय, निमशासकीय कार्यालये, केंद्र शासनाची कार्यालये, सार्वजनिक उपक्रम कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. यावेळी हेल्मेट धारकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करून उपस्थितांना हेल्मेट वापरामुळे जिविताच्या रक्षणास होणाऱ्या उपयोगाबाबत प्रबोधन करण्यात आले. हेल्मेट नसलेल्यांना प्रारंभी प्रबोधन करून हेल्मेट खरेदीस प्रोत्साहित केले. प्रसंगी नियमानुसार दंडात्मक कारवाई केली. परिवहन विभागाने ६५० विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.

पुणे शहर वाहतूक शाखेने चौका चौकात यासाठी अधिकचे मनुष्यबळ नेमले होते. यामध्ये ४३ अधिकारी आणि ५०० अंमलदार ५१ चौक आणि शासकीय आस्थापनांच्या आवारात लाक्षणिक हेल्मेट दिवस उपक्रमात सहभाग घेतला. हेल्मेटधारी दुचाकीस्वार महिला पुरुषांनी या उपक्रमाचे स्वागत केले. पोलिसांनी हेल्मेट वापराचे महत्व प्रबोधनातून पटवून दिले. यावेळी विनाहेल्मेट वाहन चालविल्याबद्दल १ हजार ६२६ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ८ लाख १३ हजार रुपयांहून अधिक दंड आकारण्यात आला, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

समाज माध्यमांवराही स्वागत

पोलीस विभागाने या उपक्रमाचे छायाचित्रे तसेच चित्रफिती आपल्या ट्विटर हॅण्डल वर पोस्ट केल्या. त्यावर नागरिकांनी विविध प्रतिक्रिया देत उपक्रमाचे स्वागत केले.

See also  मराठमोळ्या सुविधा कडलग यांची माऊंटएव्हरेस्टला गवसणी