राहुल गांधींची आज सभा- महाविकास आघाडी करणार शक्तीप्रदर्शन

पुणे :पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आज (शुक्रवार) काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि प्रदेश उपाध्यक्ष व प्रचारप्रमुख माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, भाजपला पुणेकरांनी भरभरून दिले, त्यांचे खासदार, आमदार, शंभर नगरसेवक निवडून एकहाती सत्ता दिली. मात्र, त्यांनी पुणेकरांच्या हिताची कामे सोडून ठेकेदार व बिल्डरांच्या हिताचेच काम केले. मोदी सरकारच्या काळात बोकाळलेली महागाई, बेरोजगारीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना प्रचारादरम्यान पुणेकरांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून धंगेकर यांच्या प्रचारार्थ आज (शुक्रवार) सायंकाळी 4 वाजता आरटीओजवळील एसएसपीएमएस मैदानावर काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची सभा होणार आहे.

या सभेसाठी ४० फुट गुणिले ३० फुट असे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून तीस ते पस्तीस हजार नागरिकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.  सूरक्षेच्या कारणास्तव १० ते बारा हजार आसन क्षमता कमी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळून व्हिव्हीआयपींना प्रदेश दिला जाणार आहे. या प्रवेशद्वारासह एकूण तीन प्रवेशद्वारे ठेवण्यात आले असून 4 ठिकाणी एलईडी स्क्रिन उभारण्यात आले आहेत. सभेच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, बिस्कीट, रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची पथके तैनात ठेवण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

मोहन जोशी म्हणाले की राहुल गांधी यांच्या सभेमुळे कॉंगे्रस नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.राहुल गांधी यांचे विचार ऐकण्यासाठी नागरिकांमध्ये देखील उत्सुकता आहे. सभेसाठी खा. राहुल गांधी यांच्यासह महासचिव रवि चेन्नी,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. सभेस येणार्‍या नागरिकांच्या गाड्या पार्कींग करण्याची व्यवस्था कैलास स्मशान भुमीच्या जवळ साडेचार एकर एआयएसएसच्या जागेत करण्यात आली आहे. पुण्यातील ही सभा धंगेकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी ऐतिहासिक सभा असेल, असेही जोशी म्हणाले.

यापूर्वी पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रचार प्रमुख मोहन जोशींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभेच्या जागेची पाहणी केली.

See also  राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांनी लढण्याची प्रेरणा दिली - ना. चंद्रकांतदादा पाटील