आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंना पोलिसांकडून केलेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुण्यात आंदोलन

पुणे : दिल्लीत नविन संसद भवनाचे उद्घाटन होत असताना केंद्र सरकारच्या पोलीसांकडून आंतरराष्ट्रीय क्रिडापटुंना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गोपाळ कृष्ण गोखले चौक येथे आंदोलन घेण्यात आले.

एकीकडे संसद भवनाचे लोकार्पण होत असताना दिल्लीमध्ये लोकशाहीची हत्या चालू होती व ते आज संपूर्ण देश पाहत होता.

वर्षानुवर्षे कष्ट करून स्वतःचे नव्हे तर देशाचे स्वप्न पूर्ण करण्यात आयुष्य पणाला लावून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान उंचाविणाऱ्या खेळाडूंचे आंदोलन चिरडून टाकण्यात आले.साक्षी मलिक,विनेश फोगाट यांसह अनेक क्रिडापटूंना पोलिसांकडून धक्काबुक्की व मारहाण करत त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप यावेळी करण्यात आला.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “आंदोलन करत असलेल्या महिला खेळाडू या कुठल्याही सोयीसुविधांसाठी आंदोलन करत नाहीत तर त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचार व लैंगिक शोषणासारख्या गंभीर आरोपात आरोपी असलेल्या भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांना अटक होत नाही, या कारणासाठी हे आंदोलन सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना अक्षरशः फरफटत नेऊन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे.खेळाडूंना प्रशासनाकडून अशी वागणूक भेटत असेल तर यासारखे दुर्दैव कोणतेच नाही.आज एकीकडे लोकशाहीचा जयजयकार चालू असताना दुसरीकडे त्याच लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना पायदळी तुडवत असतानाचे दृष्य या संपूर्ण देशांने पाहिले आहे.मग देशाची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने चालू आहे हा यक्ष प्रश्न उभा राहत आहे. देशातील खेळाडूंचा अपमान हा देशाला लाभलेल्या जाज्वल्य क्रीडा परंपरेचा अपमान आहे. देशातील खेळाडूंना जर अशी वागणूक मिळणार असेल तर ही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापि सहन करणार नाही, या खेळाडूंना अशाप्रकारे मारहाण करणाऱ्या पोलिसांचे निलंबन करण्यात यावे”.

या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, जेष्ठ नेते रवींद्र माळवदकर, प्रदीप देशमुख, बाळासाहेब बोड़के, उदय महाले, राजू साने, सुषमा सातपुते, किशोर कांबळे, अर्चना चंदनशिवे, शिल्पा भोसले आणि अनेक कुस्तीपटु व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

See also  अत्यंत निराशाजनक आणि पूर्णपणे विसरता येणारा अर्थसंकल्प - पृथ्वीराज चव्हाण