पुणे : देशाचे आंतरराष्ट्रीय पदक विजेते कुस्तीगीर महिला खेळाडूंवर लैंगिक शोषण बाबत भाजपचे बाहुबली खासदार ब्रजभूषण शरण सिंह याच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी संपूर्ण देशातून आवाज उठत आहेत. त्याच्या वाईट कृत्याचा संपूर्ण देशात ठिकठिकाणी निषेध होत असताना पुण्यामध्ये खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तागीर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये महिला कुस्तीगीर खेळाडूंच्या आंदोलनास सर्व सभासद पदाधिकारी यांनी जाहिर पाठींबा व्यक्त करण्यात आला.
सह्याद्री कुस्ती संकुल वारजे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या विशेष कार्यकारणी व विशेष सर्वसाधारण सभा खासदार शरद पवार अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेस ४० जिल्हा / शहर तालीम संघाचे प्रतिनिधींनी उपस्थित होते.
सभेच्या सुरवातीला अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात नियुक्त करण्यात आलेली अस्थाई समिती बाबत सन्मानीय मुबई उच्च न्यायालयाचा निकाल जो संपूर्णपणे कुस्तीगीर परिषदेच्या बाजूने असून परिषदेचे अधिकार पूर्णपणे कसे आबाधित आहेत तो निकाल सभागृहास स्वतः वाचन करून दाखवला व या निकालाबद्दल संपूर्ण सभागृहास माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या विशेष कार्यकारणी व विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झालेले काही महत्वाचे ठराव खालील प्रमाणे :-
१. ऑलिम्पिक पदक विजेता व जागतिक पदक विजेता महिला कुस्तीगीरांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोप व त्या नंतर झालेल्या अनेक घडामोडींमध्ये महिला कुस्तीगिरांच्या आंदोलनास परिषदेचा पाठिंबा असणार आहे असे सर्वानुमते जाहीर करण्यात आले .
२. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमध्ये महिला समिती स्थापन करण्यात येणार असून या महिला समिती मध्ये आजी माजी आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर , प्रशिक्षक , पंच कायदेशीर सल्लागार असतील .
३. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अखंड पणे १९५३ सालापासून महाराष्ट्रातील पैलवानांच्या प्रगती साठी कार्यरत असून परिषदेचे अस्थित्व काही कारणास्तव धोक्यात येत असल्यास महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आपल्या न्याय हक्का साठी सर्व प्रयत्न करेल . त्यासाठी परिषदचे सर्व मान्यताप्राप्त जिल्हा तालीम संघ , प्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी ठाम पणे कुस्तीगीर परिषदेबरोबर राहून कुस्तीगीर परिषदेची मान्यता अबाधित राहण्यासाठी प्रयत्नशील राहतील.
४. उस्मानाबाद जिल्हा तालीम संघाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सभागृहात मागणी केली तसेच चालू वर्षातील परिषदेकडून आयोजित होणाऱ्या ( महाराष्ट्र केसरी , महिला महाराष्ट्र केसरी , ग्रीको रोमन , कुमार मुले , मुली ) वेगवेगळ्या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी सर्व संलग्न इच्छुक जिल्हा / शहर तालीम संघ व प्रयोजकांकडून स्पर्धा आयोजनाची मागणी परिषदेस करण्यात यावी असे सभागृहात ठरवण्यात आले , अजून इतर कुणाची मागणी परिषदेकडे आल्यास पुढील कार्यकारणी सभेत निर्णय घेऊन परिषदेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी दिली.