राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यांकडून बार्टी संस्थेच्या योजनांचा आढावा

पुणे : राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी शासकीय विश्रामगृह येथे बार्टी संस्थेच्या योजनांचा आढावा घेतला. बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी श्री. पारधी यांचे स्वागत केले.

महासंचालक श्री. वारे यांनी यावेळी बार्टी संस्थेच्या विविध योजना व नाविन्यपूर्ण योजनांची माहिती दिली. अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी बार्टी कटिबद्ध असून अनुसूचित जातीतील तरुणांना आयबीपीएस, बॅकिंग, रेल्वे, एल.आय.सी, पोलिस भरतीचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येत आहे. केंद्रीय तसेच राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, फेलोशिप देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आयोगाचे सदस्य श्री. म्हणाले , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषाच्या नावाने बार्टी कार्यरत असून या नावाला शोभेल असे काम संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करावे. बार्टी ही संस्था देशातील अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी व संविधानाचा प्रसार व प्रचार करणारी एकमेव संस्था असून जास्तीत जास्त विद्यार्थी प्रशासनात जाण्यासाठी बार्टीने गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक जोमाने काम करावे.

आयोगाच्या वतीने बार्टी संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगून त्यांनी बार्टी संस्थेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.

संस्थेतील सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागाची माहिती दिली. यावेळी बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार, विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, अनिल कांरडे, रविंद्र कदम, सतिष पाटील, वॄषाली शिंदे, आरती भोसले यांच्यासह संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

See also  दौंड उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते उद्घाटन