“कौशल्य असेल तर विकास घडेल” आमदार रवींद्र धंगेकर

पुणे : कौशल्य विकास,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य या विभागाअंतर्गत कसबा पेठ मतदार संघाचे युवाशक्ती करिअर मार्गदर्शन रतनबेन चुनीलाल मेहता गुजराती हायस्कूल, कसबा पेठ , पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

दहावी बारावीनंतरच्या करिअरच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, मुलाखतीचे तंत्र, कलचाचणी यासारख्या विषयावर मान्यवर व्याख्यात्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या करिअर शिबिरामध्ये प्रदर्शनी तसेच विविध स्टॉल्स व आयटीआयचे प्रोजेक्टस मांडण्यात आलेले होते. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपसंचालक माननीय श्री.रमाकांत भावसार यांनी केले. आपल्या प्रास्तविकात त्यांनी हे करियर शिबिर आयोजित करण्यामागचा शासनाचा उद्देश, आयटीआय मधील प्रवेश प्रक्रिया, महिलांसाठी आयटीआय मध्ये प्रवेशासाठी असलेल्या महिलांसाठीच्या राखीव जागा, औद्योगिक आस्थापनेमध्ये असलेल्या महिलांसाठीच्या रोजगाराच्या संधी इत्यादी माहिती दिली. “कष्टाशिवाय यशाला पर्याय नाही” विद्यार्थ्यांना यासारखा मोलाचा संदेश दिला.

आपल्या मार्गदर्शनपर संदेशात आमदार रवींद्र धंगेकर यांनी “कौशल्य असेल तर विकास होईल” या उद्बोधन वाक्यावर प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. “मेहनत करा यश तुमच्या पायी येऊन पडेल” यासारख्या वाक्यांनी त्यांनी मुलांना उत्तेजित केले. तसेच शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहेत, पारंपारिक शिक्षणाबरोबरच व्यवसाय शिक्षण देखील अत्यावश्यक आहे. सरकार देखील त्यासाठी प्रयत्नशील आहे. व्यवसाय शिक्षण घेतले तर तुम्ही व्यवसाय स्थापन करू शकता व आपल्याबरोबरच इतरांच्या उपजीविकेचेही साधन बनू शकतात असा महत्वपूर्ण संदेश दिला.

व्याख्याते डॉक्टर सोपान गंभीरे यांनी दहावी बारावीनंतरच्या करिअरच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले.तसेच स्पर्धा परीक्षा, आपल्या आवडीनुसार संधी शोधल्या पाहिजेत, स्वप्न बघायला शिकले पाहिजे यावरील मार्गदर्शन केले तर पांडुरंग सुपेकर यांनी व्यक्तिमत्व विकास यावर विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना “जगण्यासाठी वित्त हवं,वित्तासाठी कमवायला हवं आणि कमवायला काहीतरी करायला हवं” हे जीवनाचे यशस्वी सूत्र सांगितले. क्षमता समजून कौशल्य वाढवा व त्याचे संधीत रूपांतर करा असा मूलमंत्रही दिला.

See also  मुंबई येथे खून करुन मृतदेह मुळशी परिसरात टाकणारे चार आरोपींना जेरबंद

कार्यक्रमाचे आभार संस्थेचे उपप्राचार्य अशोक साबळे यांनी मानले. श्री अशोक साबळे, श्री.सुनील तुपलोंढे व सौ.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टरित्या आयोजित केलेले होते. आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे आदी उपस्थित होते. उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी कौशल्य प्रदर्शनीचीही पाहणी केली व कौतुक केले.