मोहिते पाटलांच्या ” बलराज ” अश्वाचे देहूकडे प्रस्थान
आज जगतगुरुंच्या पालखीचे श्री क्षेत्र पंढरीकडे प्रस्थान

अकलूज / सूर्यकांत भिसे – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते – पाटील यांच्या ” बलराज ” या स्वाराच्या अश्वाचे आज ( शुक्रवार ) दि . ९ जून रोजी श्री क्षेत्र देहूकडे प्रस्थान झाले .
पंढरपूरच्या आषाढी वारीला जाण्यासाठी मोठ्या संख्येने लाखो भाविक श्री क्षेत्र देहूमध्ये दाखल होऊ लागले आहेत. उद्या शनिवारी (दि. १० जून) दुपारी दोनच्या सुमारास श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे मंदिरातून प्रस्थान होणार आहे. त्यासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे तर या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोहिते पाटील यांचा ” बलराज ” हा स्वाराचा अश्व मार्गस्थ झाला आहे .
आज ( शुक्रवार ) सकाळी ११ . ३० वाजता मोहिते पाटील यांच्या धवलनगर येथील प्रतापगडावर ” बलराज ” या स्वाराच्या अश्वाची विधीवत पूजा कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील व उर्वशीराजे मोहिते पाटील या उभयतांच्या हस्ते झाली . यावेळी आण्णासाहेब इनामदार , माणिकराव मिसाळ , शिवाजीराव इंगवले देशमुख , कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश पालकर , नाना काळे आदींसह भाविक उपस्थित होते . हा अश्व आज सायंकाळी वाहनाने श्री क्षेत्र देहू येथे पोहोचेल .
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात अश्व देण्याची परंपरा जुनी आहे . राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्याकडे देहू संस्थानने अश्वाची मागणी केली होती तेंव्हापासून मोहिते पाटील घराण्याचा अश्व पालखी सोहळ्यात सहभागी होतो असे डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले .
” बलराज ” हा अबलक अश्व उदयपूर राजघराण्यातील ” जयराज ” या अश्वाचा नर आहे . तो चार वर्षाचा असून पालखी सोहळ्यात पाठविण्यापूर्वी त्याचा रोज सराव घेतला जात होतो . पालखी सोहळ्यात लाखो लोक अश्वाचे दर्शन घेतात . त्याच्या अंगाला स्पर्श करतात . यावेळी तो विचलित होवू नये म्हणूनही त्याला खास प्रशिक्षण दिले जाते . त्याचा खुराक , पाणी व देखभाल करण्यासाठी शशिकांत बीटे व हसन शेख हे दोन सेवक अश्वाबरोबर असणार असल्याचेही डॉ मोहिते पाटील यांनी सांगितले .

See also  केजरीवाल यांना सीबीआयने दिलेल्या नोटिस विरोधात आणि मोदी सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात आपचा राज्यभर सत्याग्रह;पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर काळी फीत बांधून निषेध

शनिवारी पालखी प्रस्थान सोहळ्यात होणारे धार्मिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे

पहाटे ५ वाजता – श्री’ची संत तुकाराम शिळा मंदीर, श्री विठ्ठल-रखुमाई महापूजा
पहाटे ५.३० वाजता – तपोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा
सकाळी ९ ते ११ वाजता – श्री संत तुकाराम महाराज पादुका पूजन, इनामदार वाडा.
सकाळी १० ते १२ वाजता – पालखी प्रस्थान सोहळा काला कीर्तन
दुपारी २ वाजता – पालखी प्रस्थान सोहळा , अश्व व दिंड्यांचे देउळवाड्यात आगमन

सायंकाळी ५ वाजता – पालखी प्रदक्षिणा
सायंकाळी ६.३० वाजता – पालखी सोहळा मुक्काम, इनामदार वाडा, मुख्य आरती.
रात्री ९ वाजता कीर्तन, जागर
आदी कार्यक्रम होणार आहेत .