सारथी संस्थेमार्फत शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी निवासी प्रशिक्षणाचे आयोजन

पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेमार्फत (सारथी) शेतकरी कंपनीच्या गटातील संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रतिनिधिक सभासद यांच्यासाठी विनाशुल्क पाच दिवसीय निवासी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम योजना सन २०२३- २०२४ साठी घोषित करण्यात आली आहे.

सारथीने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांचेशी सहकार्य करार केलेला आहे. संस्थेकडे प्रशिक्षण राबविण्याचा अनुभव व तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध आहे. प्रशिक्षण पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, वर्धा, नागपूर, दापोली, जि. रत्नागिरी या ठिकाणी आयोजित करण्यात येणार असून प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकरी कंपनीशी निगडीत विविध विषयतज्ञाचे मार्गदर्शन, प्रशिक्षण साहित्य, भोजन, निवास, क्षेत्रीय भेट व प्रमाणपत्र इत्यादी बाबींचा समावेश आहे.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेतकरी उत्पादक कंपनींना पुढील दोन वर्षे नि:शुल्क मार्गदर्शन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मार्फत करण्यात येणार असून त्यामध्ये संबंधितांना व्यवसायिक संधी उपलब्ध करून देणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, निविष्ठा पुरवठा, बाजारपेठ जोडणी, इक्विटी ग्रॅन्ट, प्रस्ताव, शेतकरी उत्पादक कंपनी निगडीत योजना, बँक व वित्तीय संस्थांकडून निधी उपलब्धता, शेतकरी उत्पादक कंपनीशी निगडीत शासकीय अधिकारी इतर भागधारक यांच्यामध्ये समन्वय साधणे आदी सेवा पुरविण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास या संस्थांना कालानुरूप विविध नाविन्यपूर्ण विषयाचे पुढील आर्थिक वर्षात शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रगतीच्या आधारे प्रशिक्षणाची अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

निवडीचे निकष
शेतकरी उत्पादक कंपनी सभासद हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. प्रशिक्षणासाठी पात्र व्यक्ती ही मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील असावी व शेतकरी उत्पादक कंपनीची सभासद असावी. प्रशिक्षणासाठी पात्र लक्षित गटातील व्यक्ती आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय (ईडब्लूएस)/नॉन क्रीमिलीयर गटातील असावी. सदर सभासद शेतकऱ्यांचे मागील ३ वर्षाचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. याबाबत संबंधित तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला असावा. उत्पादक कंपनीची कंपनी कायदा २०१३ नुसार कंपनीची नोंदणी झालेली असावी. कंपनीच्या भागधारकांची संख्या ५० पेक्षा कमी नसावी. शेतकरी हा नाबार्ड किंवा इतर शासकीय योजनेद्वारे प्रशिक्षणासाठी अनुदान प्राप्त शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद नसावा. एका कंपनीतील जास्तीत-जास्त पाच व्यक्ती प्रशिक्षणासाठी सहभागी होऊ शकतात.

See also  औंध भागात ज्येष्ठ नागरिकांना कॅलेंडर वाटून नववर्षाच्या शुभेच्छा, सलग 25 वर्ष कार्यक्रमाचे आयोजन

प्रशिक्षणासाठी विहित नमुन्यातील ऑनलाइन अर्ज https://sarthi-maharashtragov.in/ व https://mahamcdc.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे बंधनकारक आहे. शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे प्राप्त अर्जापैकी मुल्यांकनाद्वारे अधिक गुणांक प्राप्त करणाऱ्या राज्यातील प्रथम १९२ शेतकरी उत्पादक कंपनीच्या लक्षित गटातील संचालक, सभासद, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सन २०२३- २०२४ मध्ये प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या क्षमता बांधणी प्रशिक्षण योजनेचा मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील शेतकरी उत्पादक कंपनींनी अधिकाअधिक लाभ घ्यावा, असे आवाहन सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.