मांजरी : पुणे महानगरपालिके कडून मांजरी बुद्रुक गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम दिलेल्या ठेकेदाराकडून नागरिकांच्या वाट्याचे पाणी व्यावसायिकांच्या घशात घालण्याचे काम सुरू असताना जागरूक नागरिकांनी विक्री होत असलेला पाण्याचा टँकर अडवून कारवाईची मागणी केली.
यामुळे माळवाडी,मांजराईनगर, गावठाण,सटवाईनगर, कुंजीर वस्ती या भागातील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. यामुळे नागरिकांनी शुक्रवारी(दि. १६) नागरिकांनी पाण्याचा टँकर अडवून संताप व्यक्त केला.टँकरचालक, ठेकेदार व मुकादम संगनमताने व्यवसायिकांना पाणी विकत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. टँकरचालक महिलांना एका बॅलर भरूनदेण्यासाठी वीस रुपये आकारत आहेत. हॉटेल, भाडेतत्त्वावरील इमारतीच्या ठिकाणी संपूर्ण टँकर खाली करण्यासाठी तीनशे ते पाचशे रुपये घेतले जात आहे. संबंधित ठेकेदार आणि लष्कर पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता निखिल रंधवे यांच्याकडे तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही. रहिवाशांच्या हक्काचे पाणी मांजरी बुद्रुक परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.
नागरिकांच्या हक्काचे पाणी व्यावसायिकांच्या घशात घातले
जात असल्यामुळे संतप्त नागरिकांनी पाण्याचा टँकर अडवून निषेध व्यक्त केला. मनमानी करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई व्हावी, याभागातील पाणी पुरवठ्यासाठी नवीन ठेकेदार नेमावा तसेच नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची देखील बदली करण्यात यावी अशी मागाणी यावेळी नागरिकांनी केली.
पाणीपुरवठा अधिकारी कनिष्ठ अभियंता निखिल रंधवे म्हणाले, मांजरी बुद्रुक गावामध्ये पुणे महानगरपालिके कडून मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पालिकेच्या पाण्यासाठी कोणी पैसे मागितल्यास त्याची माहिती पालिकेला कळवण्यात यावी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल.