राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची आढावा बैठकीत पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांचे दुबार पेरणी संकट आदी विषयांवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची आढावा बैठक आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे संपन्न झाली. बैठक संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. महाराष्ट्रात पाऊस लांबल्यामुळे आणि पाण्याचे साठे अपुरे असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू शकतो, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटे ओढावू शकते, अशा विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात होणाऱ्या राजकीय सर्वेक्षणांवर ते म्हणाले की, असत्यावर आधारीत सर्वेक्षणाच्या बातम्या राज्यात येत आहेत. अलीकडे होणाऱ्या सर्वेक्षणामध्ये काही तथ्य दिसत नाही. आम्ही ज्याठिकाणी सर्वेक्षण केले तिथे राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडी बळकट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ज्या निवडक मतदारसंघांचे सर्वेक्षण पक्षाकडून करण्यात आले आहे त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आजच्या दिवशी गद्दार दिवस म्हणून निषेध व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाची तयारी केली होती. परंतु पोलिसांनी हे आंदोलन होऊ नये यासाठी महेबूब शेख व त्यांच्या सहकाऱ्यांना सकाळीच ताब्यात घेतले. महाराष्ट्रात आंदोलन करण्याची परवानगी मिळत नाही. तसेच कोणीही सरकारविरोधात बोलू नये अशी मानसिकता ठेवून पोलिसांचा वापर करून, आंदोलने चिरडण्याचे काम महाराष्ट्रात सर्रास सुरु आहे, अशी टीका त्यांनी केली.

See also  स्वच्छता अभियान लोकचळवळ व्हावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे