पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना “यशस्विनी सन्मान” पुरस्कार दिला जातो. कृषी, साहित्य, उद्योजकता, सामाजिक, पत्रकारिता आणि क्रीडा प्रशिक्षण अशा सहा क्षेत्रातील यशस्विनींचा खासदार शरद पवार यांच्या हस्ते व प्रख्यात लेखक-कवी जावेद अख्तर आणि ज्येष्ठ अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे पार पडला.
२२ जून १९९४ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात महिला धोरणाची अंमलबजावणी केली. त्याला २८ वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने राज्यातील कर्तृत्त्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी गेल्या वर्षी २०२२ साली ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार’ सुरु करण्यात आले. यावर्षी महिला धोरणाला २९ वर्षे पुर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती.
या कार्यक्रमात संपूर्ण सेंद्रिय खतांचा उपयोग करून शेती पिकवणाऱ्या सातारा जिल्ह्यातील भारती नागेश स्वामी यांना ‘यशस्विनी कृषी सन्मान पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. विविध विषयांवर कथा, कादंबरी यांसह चौफेर लिखाण करणाऱ्या सांगली येथील डॉ. सुनिता बोर्डे-खडसे यांना ‘यशस्विनी साहित्य सन्मान पुरस्कारा’ने तर उद्योजकता क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या नांदेड येथील राजश्री पाटील यांना ‘यशस्विनी उद्योजकता सन्मान पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.
आपल्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पुणे येथील लक्ष्मी नारायणन यांना ‘यशस्विनी सामाजिक सन्मान पुरस्कारा’ने, तर कबड्डी प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या नाशिक येथील शैलजा जैनेंद्रकुमार जैन यांना ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. विविध माध्यमातून आपली पत्रकारितेची छाप समाजमनावर उमटवणाऱ्या ठाणे येथील शर्मिला प्रभाकर कलगुटकर यांना ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान पुरस्कार’ देण्यात आला.
याप्रसंगी माजी राज्यपाल व सातारचे खासदार श्रीनिवास पाटील साहेब, खासदार डॉ फाैजियाताई खान, सुरेखाताई ठाकरे,उषाताई दराडे, आशाताई मिरगे, यशवंतराव चव्हाण सेंटरचे पुणे जिल्हा केंद्र अध्यक्ष अजित निंबाळकर, जिल्हा केंद्र सचिव अंकुश काकडे, विद्याताई चव्हाण, राजलक्ष्मी भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष व माजी महापाैर प्रशांत जगताप, वैशाली नागवडे, मृणालिनी वाणी, भारती शेवाळे, कविता आल्हाट, लोचन शिवले, वासंती काकडे, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सीईओ दिप्ती नाखले, लोकप्रतिनिधी व सहकारी यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.