’शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा मंडप नव्हे तर काम सुरू असतांना दोन फ्रेम निसटल्या- सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण

पुणे : जेजुरी पालखी तळ (ता. पुरंदर) येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उभारण्यात येत असलेल्या मंडपाच्या शेवटच्या लांबीतील काम सुरू असताना सांगाड्यातील दोन फ्रेम निसटून खाली पडल्या होत्या. या कार्यक्रमासाठी उभारलेला मंडप कोसळला नसून काम प्रगतीत असताना ही घटना घडलेली आहे, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे.

जेजुरी पालखीतळ येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी सा.बां. विभागामार्फत जेजुरी पालखी तळ येथे १ लाख ५६ हजार ५०० चौ. फूट आवारामध्ये ॲल्युमिनिअम जर्मन हँगर (वॉटर प्रूफ) मंडप करणे, स्टेज, बैठक व्यवस्था आदी कामे करणे प्रगतीत होते. ॲल्युमिनिअम जर्मन हँगर मंडप उभारणीसाठी सर्व प्रथम सर्व स्ट्रक्चरल अॅल्युमिनियम फ्रेमची जमिनीवर जोडणी करुन तो सांगाडा हायड्रॉलिक क्रेनद्वारे उभारण्यात येतो. सर्व फ्रेमवर्क पूर्ण झाल्यावर ते बेस प्लेट व बोल्टच्या माध्यमातून अंतिम करण्यात येते, त्यानंतर त्यावर वॉटरप्रूफ कापड टाकून मंडपाचे काम अंतिम करण्यात येते.

११ जुलै २०२३ रोजी रात्री मुख्यमंडपाच्या ५६० फुट लांबी पैकी शेवटच्या ५० फूट लांबीमध्ये मंडपाचे सांगाडा उभारणीचे काम हायड्रॉलिक क्रेनद्वारे प्रगतीत होते. सदर सांगाडा क्रेनद्वारे उभारल्यानंतर बेसप्लेट बसविणे व नटबोल्टद्वारे तो पक्का करणे बाकी होते. त्यामुळे सदरच्या सांगाड्यातील दोन फ्रेम निसटून खाली पडल्या आहेत. सदरची घटना ही काम प्रगतीत असताना झाली आहे. सदर मंडपातील ५०० फुट लांबीचा मंडप पूर्ण झालेला असून तो पुर्णपणे सुस्थितीतीमध्ये आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी उभारलेला मंडप कोसळला नसून काम प्रगतीत असताना वरील घटना घडलेली आहे.

मंडप उभारणीचे काम सुरक्षिततेच्या सर्व निकषांचे पालन करूनच पूर्ण करण्यात येत आहे. तसेच सदर मंडप व स्टेज यांचे काम पूर्ण झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामाची स्थीरता (स्टॅबिलिटी) तपासून त्यानुसार आवश्यक ते प्रमाणपत्र देण्यात येते. त्यानंतरच सदरचा मंडप हा कार्यक्रमासाठी वापरण्यात येतो, असेही सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार यांनी कळविले आहे.

See also  पुणे विभागातील घरगुती नळजोडणीची कामे मिशन मोडवर करण्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश