पुण्यात अजितदादा समर्थकांकडून रिक्षा चालकाला मारहाण; अशी समाजसेवा नको बाबा..

पुणे : पुण्यात अजितदादा समर्थकाकडून एका रिक्षाचालकास मारहाणीची धक्कादायक घटना बाणेर भागात घडली आहे. बाणेर भागात वाहतूक सुरळीत करताना बाबुराव चांदेरे यांनी रिक्षाचालकास मारहाण केली. चांदेरे हे पुणे महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहे. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर चांदेरे हे अजित पवार यांच्या गटात गेले आहेत. रस्त्यामधील वाहतूक कोंडी सोडवताना अशा प्रकारे मारहाण करून समाजसेवेचा प्रयत्न होत असेल तर अशी समाजसेवा नको बाबा अशी भूमिका नागरिक व्यक्त करत आहेत.

पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून नेहमीच दादागिरी केली जाते असा आरोप केला जातो. आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांना सत्तेची ताकद मिळाली आहे. आपला नेता मंत्री होताच पुण्यात दादा समर्थकांची दादागिरी सुरू झाली आहे. चांदेरेंनी रिक्षाचालकास मारहाण केल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यानेही मारहाण केली. एका रिक्षाचालकास तीन-चार जण मारहाण करत असल्याचे दिसत आहे.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या घटनेनंतर बाबुराव चांदेरे यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाणार का? उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय राहिल याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

See also  महानगरपालिकेतील एकवट मानधनावरील 149 कर्मचारी कायमस्वरूपी रुजू होण्याच्या प्रस्तावाला सरकारची मान्यता