संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमाला सांगवीमध्ये उत्साहात संपन्न

सांगवी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने बहि:शाल शिक्षण मंडळ केंद्र अंतर्गत ‘संत गाडगेबाबा व्याख्यानमालेचे’ आयोजन नुकतेच अखिल जेष्ठ नागरिक संघ,शितोळे मार्केट सांगवी येथील ज्येष्ठ नागरिकांच्या सभागृहामध्ये करण्यात आले होते.

या व्याख्यानमालेचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर बाळकृष्ण झावरे यांच्या हस्ते झाले तर याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड मनपा माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे हे उपस्थित होते आपल्या उद्घाटन पर भाषणामध्ये प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी महाविद्यालयाच्या आणि विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात शुभेच्छा देताना ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवाचे मार्गदर्शन तरूण पिढीला करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला समन्वयक प्राध्यापक भास्कर घोडके यांनी या कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. ” समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता आले पाहिजे, त्यांनाही विद्यापीठाचा ज्ञानाचा फायदा झाला पाहिजे, त्यांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास झाला पाहिजे हा या कार्यक्रम आयोजन करण्यामागची मुख्य भूमिका असल्याचं त्यांनी व्यक्त केलं “.

या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा. डॉ.शमशुद्दीन तांबोळी यांच्या ‘ज्येष्ठांचे सामाजिक योगदान ‘ या विषयाने झाले. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात त्यांनी विविध उपक्रमात सहभाग घेऊन ज्येष्ठ नागरिक देखील समाजापुढे आदर्श उभे करू शकतात हे सोदाहरण स्पष्ट केले. या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ह.भ. प. विशाल महाराज फलके यांच्या ‘ या जन्मावर या जगणावर शतदा प्रेम करावे ‘ या विषयावर झाले. आपल्या मनोगतात त्यांनी ज्येष्ठांनी आपल्या वाट्याला आलेले जीवन कसे आनंदी जगावे याविषयी मार्गदर्शन केले. ह्या व्याख्यानालाचे तिसरे पुष्प प्रा.डॉ. प्रदीप शहा यांच्या ‘ रम्य ते म्हातारपण ‘ या विषयावरती झाले. ज्येष्ठांनी आपले जीवन जगत असताना तरुणांना त्यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्वातंत्र्य द्यावे, गरज असेल तिथेच मार्गदर्शन करावे आणि आपले जीवन आनंदी जगावे असा सल्ला दिला. या व्याख्यानमालेच्या आयोजनामध्ये अखिल सांगवी जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी स्थायी समिती सदस्य अध्यक्ष प्रशांत शितोळे,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र निंबाळकर, सचिव, भानुदास भोरे , बबनराव शितोळे व त्यांचे इतर सहकारी यांनी व्याख्यानमाल्याच्या आयोजनामध्ये सहभाग घेतला .या व्याख्यानमालेला सांगवी परिसरातील बहुसंख्य जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाविद्यालयातील बहि:शाल शिक्षण मंडळाचे समन्वयक प्रा. भास्कर घोडके, प्रा.विक्रम मालतुमकर प्रा.विजय घारे, प्रा. संतोष सास्तुरकर, महाविद्यालयातील प्रयोगशाळा मदतनीस सनी पावले यांनी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजनात सहभाग घेतला.

See also  जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत बाह्यवळण रस्त्यास १० कोटी ६८ लाखांचा निधी मंजूर