परदेशात फिरायला पंतप्रधानांना वेळ आहे, पण जळणाऱ्या मणिपूरसाठी वेळ नाही -इंडिया फ्रंट, पुणे चा सवाल

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यात काळे झेंडे दाखवून करणार निषेध आंदोलन ; ज्येष्ठ विचारवंत बाबा आढाव करणार नेतृत्व

पुणे : परदेश दौरे करायला पंतप्रधानांकडे वेळ आहे, पण जळणाऱ्या मणिपूरला भेट देण्यासाठी वेळ नाही. चार महिन्यांपासून देशातले हे राज्य हिंसाचार, अत्याचाराने जळते आहे, पण पंतप्रधानांना त्याविषयी संसदेत निवेदन करण्याइतकीही संवेदनशीलता नाही. अशा परिस्थितीत, एका संस्थेचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येणाऱ्या पंतप्रधान मोदी यांना काळे झेंडे दाखवून तीव्र निषेधाचे आंदोलन करण्याचा निर्णय इंडिया फ्रंट, पुणे तर्फे घेण्यात आला आहे. १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता इंडिया फ्रंट, पुणे चे सर्व सहकारी पक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक , जेष्ठ समाजनेते डॉ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करून विरोध दर्शवणार आहेत, अशी माहिती प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी इंडिया फ्रंट, पुणे चे समविचारी असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (शरद पवार गट),  माजी आमदार जयदेव गायकवाड,शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी आमदार रमेश बागवे, कम्यूनिस्ट पक्षाचे कॉम्रेड अजीत अभ्यंकर, तसेच नितीन पवार, लता भिसे, मेधा थत्ते, दत्ता पाकिरे, अनिस अहमद, संदीप बर्वे ,इब्राहीम खान,दीपक पाटील, सुरेखा गाडे  आदी उपस्थित होते.

प्रशांत जगताप म्हणाले,‘मणिपूर जळत असताना, पंतप्रधान वाजतगाजत पुरस्कार स्वीकारतात, हे दुर्देवी आहे. देशातले एक राज्य अराजक अनुभवत असताना, पंतप्रधानांना तिथे जावेसे वाटत नाही, याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही ‘प्राईम मिनिस्टर गो टू मणिपूर, आन्सर टू पार्लमेंट’ असा हॅशटॅग चालवणार आहोत. या पुरस्कार स्वीकारण्याच्या निमित्ताने पंतप्रधानांचा खरा चेहेरा सर्वांसमोर आला आहे. आम्ही इंडिया फ्रंटच्या रूपाने सर्वजण मणिपूरसोबत आहोत,’.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले कि पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन कि बात’ मध्ये बोलतात, एकटेच बोलतात मात्र संसदेत बोलत नाही ही अधोगती आहे .

अजित अभ्यंकर यांनी ‘कष्टकरी आणि कामगारवर्ग मोदींविरोधी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले. ‘कामगार कायदे उध्वस्त करून, साऱ्यांना कॉर्पोरेट्सच्या ताब्यात देण्याचा कंत्राटी उद्योग चालू देणार नाही. कामगार संघटना संयुक्त कृती समिती थेट रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी होईल, असे ते म्हणाले,

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सिहंगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण

लता भिसे सोनावणे यांनी मोदी यांनी देशातील नागरिकांचे संविधानिक हक्कच मोडीत काढल्याची टीका केली. विद्वेषाचे राजकारण करणाऱ्यांचा आम्ही रस्त्यावर उतरून निषेध करणार आहोत. ९३ वर्षांच्या ज्येष्ठ विचारवंत बाबा आढावांना रस्त्यावर उतरावे लागावे, ही नामुष्की मोदींनी आणली आहे, असे त्या म्हणाल्या. मेधा थत्ते म्हणाल्या,‘मणिपूरमध्ये अत्याचार सुरू असताना पंतप्रधान आणि गृहमंत्री काय करत होते, हा प्रश्न सर्वांनी त्यांना विचारला पाहिजे.

यावेळी प्रमुख इंडिया फ्रंट पुणेचे अनेक पधादिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.