चांदणी चौकात पादचारी पूल उभारण्यात यावा! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

कोथरूड : पुण्याचे पश्चिम प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकात प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन पादचारी पूल उभारण्याची विनंती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली असून, त्यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली. तसेच, पादचारी पूल उभारण्यात येईपर्यंत नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडू नये, महामार्ग ओलांडताना विशेष दक्षता घ्यावी असे आवाहन ही नामदार पाटील यांनी केले आहे.

पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार चांदणी चौक प्रकल्पाचे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या नवीन पुलामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला आहे. मात्र, सदर भागात पाषाण-बावधन-कोथरुडकडून मुंबईकडे आणि मुळशीकडून सातारा व पाषाण-कोथरुडकडे जाण्यासाठी धोकादायक पद्धतीने महामार्ग ओलांडून जावे लागत होते. त्यामुळे सदर बाब पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली असून, या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची विनंती पालकमंत्री पाटील यांनी केली आहे.

या संदर्भात नामदार चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. “चांदणी चौकाच्या प्रकल्पाच्या मूळ प्रस्तावात पादचारी पूल (footover Bridge) चा समावेश नव्हता. त्यामुळे पाषाण-बावधन-कोथरुडकडून मुंबईकडे आणि मुळशीकडून सातारा व पाषाण-कोथरुडकडे जाण्यासाठी धोकादायक पद्धतीने महामार्ग ओलांडून जावे लागते. असे करताना अपघाताची शक्यता लक्षात घेता पालकमंत्री नात्याने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.”

नामदार पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये पुढे म्हणाले आहे की, “पाषाण ते मुळशी दरम्यान नवीन पादचारी पूल उभारण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यामुळे चांदणी चौकात नवीन पादचारी पूल (FOB) उभारण्यात येणार असून हा पूल नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपयुक्त आणि महत्वाचा ठरणार आहे. नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडू नये, महामार्ग ओलांडताना विशेष दक्षता घ्यावी अशी माझी सर्व पुणेकरांना विनंती आहे.” असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

See also  पिंपळोली येथे भैरवनाथ दूध संकलन केंद्रात मोफत चारा व बियाणे वाटप