महाराष्ट्राने मतदार जागृतीबाबत देशापुढे आदर्श मॉडेल निर्माण करावे – राज्यपाल रमेश बैस

‘मी द सुपर हिरो भारताचा नागरिक’ या कॉमिक पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : मतदानाकडे लोकशाहीतील उत्सव म्हणून पाहिले पाहिजे. ‘अगोदर मतदान, नंतर बाकीचे काम’ हे तत्त्व लोकशाहीत सर्वांनी पाळले पाहिजे. महाराष्ट्रात मतदानाबाबत जनजागृतीचे कार्य चांगले होत आहे. बहुमाध्यमांच्या मदतीने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून राज्याने मतदार जनजागृतीबाबत देशापुढे आदर्श मॉडेल निर्माण करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.

किशोरवयीन मुले व युवकांमध्ये मतदार जनजागृती करुन लोकशाही प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या ‘मी द सुपर हिरो भारताचा नागरिक’ या कॉमिक पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते सोमवारी (दि. ११) राजभवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

गरीब लोक मतदानाला आवर्जून जातात. गरिबांपेक्षा श्रीमंतांमध्ये मतदार जागृतीची अधिक गरज आहे.

इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातील मतदार अधिक सुज्ञ असून गावपातळीवर एकाच वेळी तीन निवडणूक असल्या आणि उमेदवारांना निवडणूक चिन्ह नसले, तरी देखील लोक पाहिजे त्याच उमेदवाराला मतदान करतात, असे राज्यपालांनी सांगितले.

आपल्या देशात संविधान स्वीकारल्याच्या पहिल्या दिवसापासून महिलांना देखील मतदानाचा समान हक्क देण्यात आला. आज देश जगातील सर्वात युवा देश झाला असून लोकशाहीचे भवितव्य युवकांच्या हाती आहे. त्यामुळे युवकांनी लोकशाही, शासन व प्रशासनाच्या कामकाजात रुची घेणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव जोडणे व काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करावी, अशीही सूचना राज्यपालांनी केली.

‘आगम’ संस्थेच्या कामाचे कौतुक करुन मतदार जागृतीची पुस्तके व साहित्य स्थानिक भाषेत असावे, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी निवडणूक आयोगाच्या मतदार जागृती कार्यक्रमाची माहिती दिली. विमुक्त व भटक्या जमाती, दिव्यांग, तृतीयपंथी, बेघर अशा सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचण्याचा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयांमध्ये ‘मतदार साक्षरता क्लब’ सुरु केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

पुस्तक प्रकाशन सोहळ्याला सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, ‘आगम’ संस्थेच्या संस्थापक व पुस्तकाच्या लेखिका भारती दासगुप्ता, अनुराधा सेनगुप्ता तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व ‘आगम’ संस्थेशी निगडित निमंत्रित उपस्थित होते.

See also  पत्रकार झाला फौजदार सुशांत उपाध्ये यांचे यश