पुणे : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या औंध बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडी सोमेश्वर वाडी बोपोडी सुस महाळुंगे गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
यावेळी औंध येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राजमाता चौक येथे जालना येथे झालेल्या लाठी चार्जचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच आरक्षणासह मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्याची मागणी करण्यात आली.
हॉटेल भैरवी जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
सोमेश्वर वाडी येथे मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुचाकी रॅलीची सुरुवात करण्यात आली. पाषाण येथे मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाषाण गाव, ढेरे बक्कळ सुतारवाडी सुस रोड आधी परिसरात रॅली काढण्यात आली.
सुतारवाडी येथे भैरवनाथ मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
बाणेर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ औंध, बालेवाडी, बाणेर, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी सुस, महाळुंगे आदी गावातील मराठा बांधवांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालेवाडी फाटा उपोषण स्थळापर्यंत पदयात्रा काढण्यात आली.
मराठा समाजाच्या मागण्या मांडण्यासाठी बाणेर येथे बालेवाडी फाटा जवळ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. तसेच जालना येथील आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज ची चौकशी करण्यात यावी. सारथी संस्थेच्या निधी व उपक्रमांमध्ये वाढ करण्यात यावी. एखाद्या गावामध्ये मराठा समाजाच्या भावकीमध्ये ओबीसी प्रमाणपत्र असल्यास त्या आधारे त्या गावातील आडनावाच्या सर्वांना अर्ज प्रक्रिया द्वारे ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे. जातीय जनगणना करण्यात यावी तसेच बाणेर बालेवाडी परिसरामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी होस्टेल बांधण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मराठा समाजाच्या बंदला जाहीर पाठिंबा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला.