बाह्यवळण महामार्गावर स्वामीनारायण मंदिर ते रावेत इलेव्हेटेड हायवेसाठी डीपीआर तयार -खासदार सुप्रिया सुळे

पुणे : मुंबई-बंगळूर बाह्यवळण महामार्गावरील नऱ्हे भागातील स्वामी नारायण मंदिर ते रावेत या संपूर्ण परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांनी एलिव्हेटेड हायवे बांधण्यासाठी ४ हजार कोटी रुपयांचा डीपीआर तयार केला आहे. यासोबतच कोथरूड ते मुळशी दरम्यान भुयारी मार्ग आणि पूल तसेच सेवा रस्त्यांचे काम लवकरच सुरू होत आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

या रस्त्यांबाबतच्या विविध अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी सुळे यांनी आज एनएचएआयच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत ही माहिती देण्यात आली. बाह्यवळण महामार्गावर स्वामीनारायण मंदिर ते नवले पूल ते वारजे व चांदनी चौक ते रावेत येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम निकाली काढण्यासाठी त्या सातत्याने पाठपुरावा करत आहेत. याला सकारात्मक प्रतिसाद देत नीतीन गडकरी यांनी एलिव्हेटेड हायवे बांधण्यासाठी ४ हजार कोटी रुपयांचा डीपीआर तयार केला आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

वडगाव आणि वारजे पुलासह सेवा रस्त्यासाठी ३६ कोटींचा निधी मंजूर
यासोबतच कोथरुड ते मुळशी भुयारी मार्गाचे कामही लवकरच सुरु होत असून वडगाव येथील पुलासह वारजे येथील मुठा नदीवरील पुल आणि दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्याचे काम करण्यासाठी ३६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व कामासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले असून ही सर्व कामे लवकरात लवकर पुर्ण होऊन या भागातील दळणवळण अधिक सुसह्य आणि सक्षम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

See also  आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध