गदिमांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय ‘गदिमा महोत्सव’
३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी रंगणार गानमैफल; गदिमा-बाबूजींच्या आठवणींना उजाळा

पुणे : आधुनिक वाल्मिकी, प्रसिद्ध कवी, गीतकार, चित्रपट कथा लेखक ग. दि. माडगूळकर उर्फ गदिमा यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय ‘गदिमा महोत्सव’ आयोजिला आहे. येत्या शनिवारी (३० सप्टेंबर) व रविवारी (दि. १ ऑक्टोबर) सायंकाळी ५ वाजता निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात ही गानमैफल रंगणार आहे. गायिका मनीषा निश्चल यांची संकल्पना, निर्मिती व प्रस्तुती असलेल्या या महोत्सवातून गदिमा-बाबूजींच्या आठवणींनाही उजाळा मिळणार आहे.

शनिवारी (दि. ३०) सादर होणाऱ्या कार्यक्रमात गायक, लेखक व चित्रपट-निर्माता आनंद माडगूळकर यांचा विशेष सहभाग असणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त पार्श्वगायक हृषीकेश रानडे, सारेगमप, इंडियन आयडॉल, सुर नवा ध्यास नवा फ़ेम पार्श्वगायक प्रसन्नजीत कोसंबी, अनेक मान्यवरांनी गौरविलेली गायिका मनिषा निश्चल यांचे सुमधुर गायन ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. त्यांना मिलिंद कुलकर्णी यांच्या ओघवत्या निवेदनाची, तर मिहिर भडकमकर, अमृता ठाकुरदेसाई, प्रसन्न बाम, डॉ. राजेंद्र दुरकर, अपुर्व द्रविड, ऋतुराज कोरे या वाद्यवृंदाची साथसंगत मिळणार आहे.

गदिमा महोत्सव अंतर्गत रविवारी (दि. १) सुप्रसिद्ध संगीतकार व गायक श्रीधर फ़डके व गायिका मनिषा निश्चल यांचे गायन होणार आहे. सुकन्या जोशी यांचे निवेदन, तर झंकार कानडे, तुषार आग्रे, अमय ठाकुरदेसाई, प्रणव हरीदास, सिद्धार्थ कदम आदी वाद्यवृंद साथसंगत करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

See also  लहान मुले, युवक केंद्रित रस्ते सुरक्षा या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न