राज्यात ‘वाचन चळवळ’ उभी करणार – मंत्री दीपक केसरकर

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात ‘वाचन प्रेरणा दिन’

मुंबई : माजी राष्ट्रपती भारतरत्न दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी वाचन संस्कृती रुजविणे आणि वाढविण्यासाठी राज्यात लवकरच ‘वाचन चळवळ’ उभी करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘वाचन प्रेरणा दिन’ कार्यक्रमात मंत्री श्री. केसरकर बोलत होते.


यावेळी शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव हर्षवर्धन जाधव, अवर सचिव अजय भोसले, कक्ष अधिकारी ऐश्वर्या गोवेकर, सहायक कक्षधिकरी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, वाचन चळवळ ही संपूर्ण देशभरात उभी रहावी यासाठी देशात ‘रीड इंडिया’ ही चळवळ राबविली जात आहे. याच धर्तीवर राज्यात ही चळवळ उभी राहण्यासाठी लवकरच ‘वाचन चळवळ’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावर्षी उपक्रमाची सुरूवात मुंबई शहरातून करण्यात आली असून राज्यात तळागाळापर्यंत वाचनसंस्कृती पोहचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.


वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून २ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील विद्यार्थी आणि तरूण पिढीपर्यंत राज्यातील मराठी साहित्य, थोर महापुरूष तसेच शूर सरदारांचा इतिहास आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ यांचे कार्य समजावे यासाठी प्रत्येक शाळेत पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी सर्वाधिक वाचन केले जाते त्या ठिकाणी जास्त शास्त्रज्ञ घडतात. मराठी भाषा भवनचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. विश्व मराठी साहित्य संमेलनातून मराठी भाषेची महती जगभर पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्‍यात येत असल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.


डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम हे उत्तम लेखक, शास्त्रज्ञ तर होतेच याचबरोबर ते उत्तम वाचकही होते. वैज्ञानिक आणि राष्ट्रपती म्हणून ते जनसामान्यांशी जोडले गेले होते. त्यामुळे त्यांचे हे कार्य भावी पिढ्यांसाठी दिशा देणारे ठरले. त्यांची जयंती आज राज्यात सर्वत्र ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी केली जात आहे. या दिनानिमित्त संपूर्ण राज्यात शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

See also  शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित