महामेट्रोला मनपा नोटीसा देऊन थकली पण कारवाई का नाही?: मेट्रोच्या मनमर्जी विरोधात आम आदमी पार्टीचे आंदोलन

पुणे : महामेट्रोचे पदाधिकारी महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातील तरतुदींचा अभ्यास न करताच आपली कामे दामटत असल्याने जनतेचे कोट्यावधीचे नुकसान होत असल्याचा आरोप करत आज महा मेट्रोच्या मनमर्जी विरोधात आम आदमी पार्टीच्या पुढाकाराने वाकडेवाडी येथे निदर्शने करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी तीन प्रमुख मागण्या या आंदोलनादरम्यान केल्या आहेत. अनेक वर्षांपासून चा वहिवाटीचा व विकास आराखड्यानुसारचा नतावाडी ते कृषी महाविद्यालय मागील गेट हा रस्ता बंद करुन तेथे अतिक्रमण करीत दुमजली बांधकाम केले आहे, साईड मार्जिन ठेवलेले नाही असा आप चा आरोप आहे. याबाबत महानगरपालिकेने महामेट्रोस बांधकाम तातडीने काढून घ्यावे अशी नोटीस बजावली आहे असे असतानाही ते तात्पुरते बांधकाम आहे असे सांगत महामेट्रो ने हा रस्ता अजूनही खुला केलेला नाही. स्थानिक रहिवासी तसेच विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा रस्ता खुला केल्यास फायदा होणार आहे. तसेच आपत्तीच्या काळामध्ये आता कृषी महाविद्यालयास येण्याजाण्यास केवळ एकच रस्ता खुला आहे. त्यामुळे हा रस्ता खुला करण्याची स्थानिकांची मागणी आहे.

नतावाडी मेट्रो डेपो पासून खडकी सिंचन नगर असा ६० फूटी रस्ता विकासा आराखड्यामध्ये प्रस्तावित आहे. परंतु या रस्त्यावर महा मेट्रो ने अतिक्रमण करीत रेल्वे रूळ टाकलेले आहेत. हा डीपी रोड जुन्या पुणे मुंबई महामार्गाशी खडकी पर्यंत समांतर असून तेथून सिंचन नगर कडे जातो. त्यामुळे मेट्रो प्रवाशांची सोय होणार आहे तसेच महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणे अपेक्षित आहे. परंतु आता हा रस्ताच गायब केल्यामुळे यापूर्वी आपने या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती. यावर पुण्यातील आमदारांनी हा रस्ता रद्द करू देणार नाही असे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र हा रस्ता रद्द करावा असा प्रस्ताव महा मेट्रो ने राज्य सरकारकडे मांडलेला आहे. हा रस्ता रद्द केल्यास भविष्यामध्ये वाहतूक कोंडीचा त्रास या परिसरातील लोकांना होऊ शकतो व वाकडेवाडी ते खडकी महामार्गावर सुद्धा वाहतूक कोंडी होऊ शकते. यामुळे हा डीपी रस्ता असणे आवश्यक आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी पुणे तसेच बांधकाम विभागाकडून महा मेट्रोला नोटीस बजावण्यात आलेली आहे तरीही याबाबत महामेट्रो हलगर्जीपणा करीत असून या नोटिसांना केराची टोपली दाखवीत आहे असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

एसएससी बोर्ड व आकाशवाणी यांच्या मधून शिवाजीनगर एसटी स्टँड कडे जाणाऱ्या रस्त्यावर महा मेट्रो ने एक एन्ट्री एक्झिट तयार केले आहे. यामुळे या ठिकाणचा 30 मीटरचा प्रस्तावित रस्ता बाधित होत आहे. महा मेट्रोचे बांधकाम प्रस्तावित रस्त्यामध्ये येत असल्याने भविष्यात शिवाजीनगर रेल्वे स्टेशन एसटी स्टँड आणि मेट्रो कडे जाणारी वाहतूक याची एसएससी बोर्ड जवळ कोंडी होईल अशी शक्यता आहे. त्याबाबत त्याबाबतही मनपाच्या बांधकाम विभागाने महा मेट्रोला यापूर्वीच नोटीस देऊन हे बांधकाम काढून घेण्यास सांगितले आहे परंतु अजूनही याबाबत कारवाही नाहीच उलट हे बांधकाम पूर्ण केले जात आहे.
वास्तविक पाहता विकासाला खाद्यातील नकाशे स्पष्ट आहेत असे असतानाही महा मेट्रो याचा पुरेसा अभ्यास न करताच बांधकामे आणि नकाशे दामटून नेत आहे त्यामुळे भविष्यामध्ये अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होणार असे दिसते आहे महामेट्रोच्या अनेक चुका पुणे शहरांमध्ये दिसून आलेल्या आहेत. या तांत्रिक बाबींमधील हलगर्जीपणाची किंमत ही कोट्यावधी रुपयांमध्ये आहे. त्यामुळे याबाबत महामेट्रोचा अधिकारी वर्ग सक्षम नाही की बेफिकीर आहे का असा प्रश्न निर्माण होतो आहे. आम आदमी पार्टीने या तिन्ही आक्षेपाविषयी तातडीने कारवाई करून अहवाल द्यावा अशी मागणी केली आहे अन्यथा यासंदर्भात अधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.

आजच्या निदर्शनात शंकर थोरात, मुकुंद किर्दत,अनिल पवार, सतिश यादव, प्रताप पेंद्राम, राजेंद्र गंगावणे, ज्ञानेश्वर जाधव, मुकेश गायकवाड, अंबादास गिरी, बाळासाहेब उडाणे, कासिम शेख, बाळासाहेब फरांदे, दिलीप रासकर, एकनाथ ताम्हाणे, अंकुश काकरे, मारुती जोशी, मारुती भंडारे, एस एम शिवळे पाटील, अशोक काळे, राहुल भोसले, नाना बोत्रे, किरण कांबळे, सईद अली, प्रशांत कांबळे, ॲड गणेश थरकुडे,विकास चव्हाण इत्यादी उपस्थित होते. या वेळेस महामेट्रो चे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे व कृषी महाविद्यालय सहयोगी अधिष्ठाता मासाळकर यांना निवेदन देण्यात आले.

See also  आधुनिक महाराष्ट्र घडविण्यासाठी एकजुटीने कार्य करावे -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर