बारामती, दि.२६: बारामती लोकसभा मतदारसंघासाठी येत्या ७ मे रोजी मतदान होणार असून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कुरकुंभ येथील विविध उद्योगसंस्थांनी आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व कामगारांना मतदान करण्याबाबत प्रोत्साहित करावे, असे आवाहन दौंड विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले.
कुरकुंभ एमआयडीसी कार्यालय येथे उद्योग प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी स्वीप समन्वयक तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कुणाल धुमाळ, एमआयडीसीचे अधिकारी व कर्मचारी तसेच विविध कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. मुल्ला म्हणाले, दौंड विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. उद्योगांच्या प्रमुखांनी आपल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रवृत्त करावे. एकही अधिकारी व कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. मतदानाबाबत परिपत्रक काढून सर्व कर्मचाऱ्यांना अवगत करावे. मतदान सुलभपणे करता यावे, यादृष्टीने नियोजन करावे. कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी द्यावी.
यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी होण्याच्या अनुषंगाने येत्या ७ मे रोजी होणाऱ्या मतदानाच्यावेळी कामगारांना सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.