रोजगार मेळाव्यात २६२ उमेदवारांची निवड

पुणे : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग पुणे व सिम्बायोसिस स्किल ॲण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिम्बायोसिस भवन येथे आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात २६२ उमेदवारांची निवड करण्यात आली.

रोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील एकूण २० पेक्षा जास्त उद्योजकांनी त्यांच्याकडील विविध प्रकारची एकूण ३ हजार ६६ रिक्तपदे कळवून सहभाग दर्शविला. या पदांसाठी एक हजारापेक्षा अधिक बेरोजगार युवक-युवतींनी सहभाग नोंदविला. उपस्थित उद्योजकांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन २६२ उमेदवारांची निवड केली.

रोजगार मेळाव्याचे उद्घाटन सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती तथा संस्थापक अध्यक्ष डॉ. एस.बी.मुजुमदार यांच्या हस्ते झाले. मेळाव्याच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी प्रास्ताविकात मेळाव्या विषयी माहिती दिली. उद्योजक आणि उमेदवार यांच्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देत उमेदवारांना उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी मिळवून देणे हा रोजगार मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. मेळाव्यात विविध शैक्षणिक पात्रतेसाठी अधिकच्या जागा असून अनेक नामांकित उद्योजक उपस्थित असल्याची माहितीही त्यांनी दिली.

See also  महिलांना रोजगार प्रशिक्षण; ‘डीआरडीए’चा अमेरिकन इंडियन फाउंडेशनबरोबर सामंजस्य करार