सुसगाव : भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या सुसगाव येथील आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल च्या नवीन शाळेच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलाल धोंडीबा धनकुडे, पत्रकार संघ मुळशीचे उपाध्यक्ष पत्रकार केदार कदम, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, समाज कार्यकर्ते संजय सुतार, विनोद भोते, संस्थेच्या संचालक सौ सुरेखा शिवलाल धनकुडे, सचिव विराज धनकुडे, गणेश सुतार, सनी सुतार, सोमनाथ खांदवे, दशरथ सुतार, कावेरी सुतार, संस्थेच्या सीईओ सुषमा भोसले, महेश सुतार आदी उपस्थित होते.
सुसगाव परिसरामध्ये अद्यावत इंग्लिश माध्यमाची शाळा भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे.
पत्रकार केदार कदम म्हणाले, शालेय शिक्षणांबरोबरच खेळाचा विकास देखील होणे आवश्यक आहे. विद्यार्थी केंद्रित असलेल्या शाळांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आवश्यक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवणे ही एक प्रकारे समाजसेवा तसेच देशकार्य आहे.
यावेळी भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चालवले जाणारे शैक्षणिक उपक्रमांची व कोर्सची माहिती देण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना चांगले शिक्षण व गुणवत्ता पूर्ण विकासाची संधी पाल्यांना उपलब्ध करून देण्यासाठी ही शाळा महत्त्वपूर्ण असल्याचे मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले.
दरम्यान नवीन शाळेच्या इमारतीच्या आवारात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सुसगाव परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते.