पुण्याची मुंबई होऊ नये यासाठी हडपसर येथे जनजागृती अभियान

हडपसर : मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती आणि महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या माध्यमातून मुंबईमध्ये “पक्ष कोणताही असो- आमचा उमेदवार मराठीच असला पाहिजे” या मागणीसह मराठी शाळा, मराठी भाषा, परप्रांतीय लोंढे यांच्या विषयी मराठी समाजामध्ये जनजागृती, जनप्रबोधन करण्यासाठी सह्यांच्या मोहिमांचे आयोजन विविध विभागात केले जात आहे. त्याच धर्तीवर मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीच्या पुणे विभागाच्या माध्यमातून हडपसर, पुणे येथे जनजागृती, जनप्रबोधनाचे अभियान सह्यांची मोहीम घेऊन राबविण्यात आले.

परराज्यातील लोंढ्यांमुळे मुंबईमध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे, तशी परिस्थिती पुण्यामध्ये उद्भवू नये व पुण्याची मुंबई होऊ नये या उद्देशाने पुण्यातील मराठी प्रेमी तरुण सक्रिय झाले. यावेळी केवळ साडे तीन तासांत ९१० हडपसर पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत, काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करत सह्या करून मोहिमेला पाठिंबा दिला. यावेळी तेजस्विनी सावंत प्रशांत आणि त्यांची दोन मुले विधान व विधीत यांनी मागण्यांचे फलक दाखवीत सर्वांचे लक्ष वेधले.


पुणे विभागाचे मुख्य संयोजक महेश तावडे यांच्यासह प्रशांत खोत, तेजस्विनी सावंत प्रशांत, गिरीश सावंत, वैभव पोतदार, आकाश ठाकरे, भुषण सावंत, प्रताप खाडे, उमेश भोसले या पुणेकर मंडळी सह मुंबई विभागाचे प्रमोद मसुरकर, धर्मेंद्र घाग, रवींद्र शिंदे, उदय जागुष्टे आणि संजय धुरी मुंबईहून सहभागी झाले होते.
यावेळी मुख्य संयोजक महेश तावडे यांनी सर्वांचे आभार मानतानाच, अशा सह्यांच्या मोहिमा पुणे शहराच्या विविध विभागांमध्ये, गावांमध्ये घेतल्या जातील असे सांगत, त्यामध्ये पुणेकरांनी मराठी समाज व महाराष्ट्र हितासाठी सक्रिय व्हावे असे आवाहन केले.

See also  डॉ.कृष्णकुमार गोयल हे पुण्याचे कोहिनूर-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार