मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाबाबत गतिमानता पंधरवड्याचे ३० डिसेंबरपर्यंत आयोजन

पुणे : उद्योग संचालनालयाच्यावतीने ३० डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाबाबत गतिमानता पंधरवडा घोषित केला असून याबाबत जिल्हा उद्योग केंद्रातर्फे जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.

या पंधरवडा मोहिमेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत अधिकाधिक अर्ज प्राप्त करणे, ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर अर्ज भरणे, योजनेबाबत प्रत्येक तालुक्यात या योजनेची प्रचार व प्रसिद्धी करणे आदी कामे करण्यात येणार आहे. योजनेचे अर्ज नि: शुल्क भरण्यात येणार आहेत.

लाभार्थ्यांचे अर्ज त्यांच्या कागदपत्रासहीत स्विकारण्यात येणार असून त्याअर्जाची तात्काळ छाननी करुन बँकेकडे पाठविण्यात येणार आहेत. तसेच ती प्रकरणे प्राधान्याने मंजूर करुन घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्रयत्नही केले जाणार आहेत. यामध्ये बँकेकडून उपयोगिता प्रमाणपत्रे जमा करणे, प्रलंबित मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची प्रकरणे मार्गी लावणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन महाविद्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद व तहसिल कार्यालय या ठिकाणी संबंधित अधिकारी, उद्योग निरीक्षक हे नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नागरिकांच्या शंका व अडचणीचे निराकरणही करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी दिली आहे.

See also  गोखले नगर परिसरातील पूरग्रस्त घरांच्या वाढीव बांधकामावरील कराला स्थगिती नको तर तो रद्द करा - निलेश निकम