दंत आणि नर्सिंग विद्याशाखेच्या डेटाबेसव्दारे प्रथम टप्प्याचा प्रारंभ
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन

पुणे : – महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या डिजिटल लायब्ररीच्या उद्घाटन विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, विद्यापीठाच्या दंत विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. विभा हेगडे, आयुष विभागाच्या असोसिएट डायरेक्टर श्रीमती विना पाटील, एब्रॉस कंपनीचे श्री. भट आदी मान्यवर उपस्थित होते.


मा. कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, विद्यापीठाची डिजिटल लायब्ररी दुर्गम भागातील व आर्थिकदृष्टया कमकुवत विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना उपयुक्त ठरणार आहे. ही लायब्ररी प्रत्येक विद्यार्थ्याला कधीही कुठेही जागतिक दर्जाची अध्यापन सामग्री मिळवण्यास उपयुक्त ठरेल. संस्थांसाठी हे नॅक किंवा कोणत्याही वैद्यकीय तपासणीमध्ये चांगले रेटिंग मिळविण्यात मदत करेल. जिथे माहिती आहे तेथे प्रगती आणि नवनिर्मितीची गुरुकिल्ली आहे. तिथे डिजिटल लँडस्केप हे शिक्षण आणि संशोधनाचे एक आवश्यक केंद्र बनले आहे. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने शैक्षणिक फ्रेमवर्कमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून भविष्याकडे एक मोठी झेप घेतली आहे. डिजिटल लायब्ररी लाँच करणे हे विद्यार्थी व शिक्षक आणि संशोधकांना यशासाठी सर्वाेत्तम साधने प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे असे त्यांनी सांगितले.


विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिदं निकुभ यांनी सांगितले की, डिजिटल लायब्ररी हा घटक महाविद्यालयांत संशोधनाचे वातावरण तयार करण्यासाठी महत्वपूर्ण आहे. माननीय कुलगुरू महोदया यांच्या व्हिजन डॉक्युमेन्ट मधील ही अभिनव संकल्पनाला मूर्त रुप आले आहे. राज्यातील नर्सिंग आणि डेंटल कॉलेजांना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ई-जर्नल्सचा समावेश असलेल्या डिजिटल लायब्ररीत करण्यात येणार आहे.विद्यापीठाचा डिजिटल लायब्ररी हा अनोखा उपक्रम असून, अद्ययावत तांत्रिक साधनांसह या जागतिक दर्जाच्या ई-लायब्ररीमध्ये प्रवेश मिळावा, अशी इच्छा व्यक्त करणारी महाविद्यालये यात सहभागी झाली आहेत. डिजिटल लायब्ररीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन नोंदणी करून महाविद्यालय यात सहभागी होऊ शकतात असे त्यांनी सांगितले.
पुण्याच्या महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजित आयुष वर्ल्ड एक्सपोच्या कार्यक्रमात विद्यापीठाच्या डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयाचे शिक्षक, प्राचार्य, अधिष्ठाता मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठाचे कम्प्युटर प्रोग्रामर श्री. मधुकर भिसे, श्री. सचिन धेंडे, ग्रंथपाल श्री. प्रशांत शिंदे, श्री. रोहित भोये यांनी परिश्रम घेतले. मा. कुलगुरु महोदयांच्या हस्ते उपस्थित प्राचार्य यांचा सत्कार करण्यात आला.

See also  बाणेर येथे "माझी लाडकी बहीण" योजनेच्या समर्थनार्थ पूनम विधाते यांच्या वतीने आयोजित स्वाक्षरी मोहिमेस महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद